बोभाटा आपल्यासाठी घेऊन आले आहे ब्रेव्ह हार्ट या आगामी मराठी चित्रपटातले एक गीत. या चित्रपटाचे कथानक हे एका सत्य घटनेवर आधारीत आहे. चित्रपटाचे निर्माते सच्चीतानंद कारखानीस यांचा मुलगा निखिल ह्याची हि कथा. निखिल कारखानीस या उमद्या तरुणाला एका असाध्य रोगाने पछाडले. परंतु नियतीच्या मार्गात पहाडासारखे उभे ठाकले त्याचे जिगरबाज वडिल सच्चिदानंद कारखानिस. आजीचे प्रेम, मित्रांचा स्नेह, आप्तांची साथ, प्रेयसीची अकल्पित प्रेमभावना यांच्या बळावर वडिलांचा हात धरून निखिलने नियतीच्या आक्रमणावर हल्ला चढवला. तोंड उघडल्यानंतर नियती अखेर आपला घास घेतेच,परंतु तिला निधड्या छातीने सामोरे जाणाऱ्यांना ती सलामही करते. निखिल कारखानिस आणि सच्चिदानंद कारखानिस यांना तिने अशीच मनापासून दाद दिली असेल. बाप-लेकांच्या या जिद्दीची, जगण्याची, संघर्षाची, अर्थपूर्ण जगण्याची आणि लढ्याची ही कथा. ‘ब्रेव्हहार्ट-जिद्द जगण्याची.’
जगण्यांवर आत्यंतिक प्रेम करणाऱ्या आपल्या या कर्तबगार मुलाची कथा सांगत आहेत निखिलचे वडिल खुद्द सच्चिदानंद काखानिस. त्यांच्या भूमिकेत आहेत अरूण नलावडे आणि निखिलच्या भूमिकेत आहे,तरूण संवेदनशील अभिनेता संग्राम समेळ. चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत, गेली दोन दशके मराठी मनोरंजन सृष्टीत ठसा उमटवणारे ज्येष्ठ दिग्दर्शक दासबाबू.पटकथा,संवाद आणि गीते श्रीकांत बोजेवार यांची आहेत. अभिनेता किशोर कदम उर्फ कवी सौमित्र यांनी आपल्या खास शैलीत या चित्रपटासाठी एका विशेष कवितेचे सादरीकरण केले आहे. संगीतकार आहेत अर्नब चॅटर्जी.
चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक दासबाबू म्हणतात “ही प्रत्यक्षात घडलेली कथा आहे आणि ती आपल्याला स्तिमित करते. बाप आणि मुलगा यांच्या नात्यामधील गहीरेपण पडद्यावर दाखवताना आम्ही मेलोड्रामा टाळला आहे. अरूण नलावडे आणि संग्राम समेळ यांच्या अभिनयातून, पटकथा-संवादातून,संगीतातून जे नाट्य उभे राहते तीच या चित्रपटाची ताकद आहे”
