आधी घरचे सारखा मोबाईल वापरण्यावरून रागवायचे. अगदी पोट दुखतंय म्हटलं तरी "वापर अजून मोबाईल!" असं विचित्र उत्तर मिळायचं. किंवा जन्मखूण म्हणून "एका हातात सतत फोन"लिहा असे जोक्सही भरपूर ऐकले असतील. पण तोही काळ बदलला आणि आता आई-आजीला जरा व्हाटसअप कमी कर, बाबांना जेवताना मोबाईलवर मॅच पाहू नका असं सांगायची वेळ आली.
त्यातही सारखा मोबाईल वापरण्यावरून घरच्यांचे टोमणे ऐकावे लागले, कुणीतरी काही तरी बिनडोक व्हाट्सअप फॉरवर्ड सेंड केला, कुणी उगीचच अति गोड कमेंट देऊन किंवा तिरकस कमेंट देऊन सतवायला लागलं, बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडने सगळीकडे ब्लॉक करून टाकलं, महत्वाच्या वेळी महत्वाचा संदेश देण्यासाठी कुणाला फोन लावत असू आणि तो फोन आउट ऑफ रेंज किंवा स्वीच ऑफ असेल तर, अशा बऱ्याच प्रसंगी तुम्हाला फोन फेकून देऊ वाटत असेल हो ना? किंवा तुम्ही फेकला देखील असाल. पण तुम्ही तो असाच फेकला असाल ना की त्याला काही फारशी इजा होऊ नये. कारण राग क्षणिक असला तरी फोन जान से प्यारा आहे याचं भान असतं. समजा फोन फेकण्याची जर राष्ट्रीय स्पर्धा भरवली तर?



