रॅचेल, रॉस, जॉय, फिबी, मोनिका आणि चॅन्डलर ही नावे माहीत नाहीत असा इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचा विद्यार्थी सापडणे कठीण आहे. अर्थात इतर शाखांचे विद्यार्थी ही मालिका पाहात नाहीत असं आमचं काही म्हणणं नाही.. काय होतं या सहा जणांच्या ग्रुपमधे ज्यामुळे केवळ अमेरिकाच नाही तर अख्ख्या जगातल्या तरुणाईला फ्रेंड्स (F.R.I.E.N.D.S.) नावाच्या सीरियलने वेड लावलं?
१० सीझन्स आणि २३६ एपिसोडस असलेल्या या सीरियलची अनेकांनी एकदोन नव्हे, तर अनेक पारायणे केली. आख्खं कॉलेज लाईफ ही सीरियल बघतच पूर्ण करणारेही अनेकजण आहेत. कॉलेज संपलं तरी ही सीरियल काही कोणाच्या मनातून उतरली नाही. आजही अनेकजण ऑफिस किंवा कॉलेजच्या रूटीनमधून वेळ काढून फ्रेंड्सचा एखादातरी एपिसोड पाहतात. या मालिकेतल्या ग्रुपसारखा आपलाही एखादा ग्रुप असावा असं प्रत्येकाला वाटत असतं.



