सोशल मिडियाचे स्टार: ३० अंडर ३० मध्ये नाव आलेला टेक्निकल गुरुजी: गौरव चौधरी !!

लिस्टिकल
सोशल मिडियाचे स्टार: ३० अंडर ३० मध्ये नाव आलेला टेक्निकल गुरुजी: गौरव चौधरी !!

मोबाईल असो, लॅपटॉप असो की इतर कुठले गॅझेट! ते विकत घेण्याआधी प्रत्येक व्यक्ती एकदा तरी टेक्निकल गुरुजी या यु-ट्यूब चॅनेलला चक्कर नक्की मारतेच. एक टेक चॅनेल भारतातले आघाडीचे यु ट्यूब चॅनेल बनू शकते हे गौरव चौधरी नावाच्या एका पठ्ठ्याने सिद्ध केले आहे

शून्यापासून सुरू करून आज २ कोटींपेक्षा अधिक सबस्क्रायबर्सचा टप्प्या गाठणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यातही टेक्नॉलॉजीसारख्या किचकट विषयावर व्हिडिओ बनवत असताना तर लोकांना टिकवून ठेवणे हे महाकठीण काम असते. पण आज टेक्निकल गुरुजी या चॅनेलच्या मागील चेहरा असलेला गौरव चौधरी यु-ट्यूबच्या माध्यमातून काहीतरी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी प्रेरणास्थान आहे.

गौरव तसा मूळ अजमेर, राजस्थानचा आहे. वडिलांची बदली होत असल्याने राजस्थानच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याने शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करत असताना त्याच्या आयुष्यात मोठे संकट आले. त्याचे वडील एका अक्सिडेंटमुळे कोमात गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. म्हणून गौरवला आपल्या भावाकडे दुबईला जावे लागले.

२०१२ साली गौरव दुबईला पोहोचला. तिथे त्याने बिट्स पिलानी दुबई कॅम्पसमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये एम टेक पूर्ण केले. गडी हुशार होता, त्याने इथे बारीक सारीक गोष्टी शिकून घेतल्या. त्याचा उपयोग कदाचित त्यालाही माहीत नसेल पुढे कसा होणार आहे. गौरवचे शिक्षण पूर्ण झाले होते. नोकरीसाठी विविध ठिकाणी प्रयत्न करून झाल्यावर त्याला थेट दुबई पोलिसांनी सिक्युरिटी इंजिनिअर म्हणून नोकरी दिली.

इथे त्याला विशेष काम नव्हते. माहिती भरमसाठ आहे, पण त्यामानाने काम कमी अशी त्याची गत झाली. काय करावे हा विचार करत असतानाच त्याला युट्यूब चॅनेल सुरू करण्याची आयडिया आली. त्याला एक गोष्ट माहीत होती की टेक्नॉलॉजीची माहिती इंग्रजीत भरपूर उपलब्ध आहे. हीच माहिती आपण हिंदीत दिली पाहिजे. त्याने हिंदीत माहिती देण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला त्याला प्रचंड अडचणी आल्या, पण हळूहळू का होईना तो पुढे पुढे सरकत राहिला. २०१६ साली जिओ आले आणि इतर चॅनेल्ससारखी त्यालाही लॉटरी लागली. फुकट इंटरनेट असल्याने त्या काळात ज्यांनी क्वालिटी कंटेंट निर्माण केले ते आज युट्यूबमध्ये प्रस्थापित झाले आहेत. गौरव चौधरी पण त्यातलाच एक आहे. 4G फोन्स घेण्याची त्यावेळी चढाओढ लागली होती.

टेक्निकल गुरुजी या आपल्या चॅनेलवर गौरव अनबॉक्सिंग या टायटलखाली बाजारात नविन आलेल्या मोबाईल आणि इतर गॅजेट्सची माहिती देत असे. कुठला मोबाईल घ्यावा हा प्रश्न पडलेल्यांसाठी त्याचे चॅनेल म्हणजे हक्काचे ठिकाण झाले होते. आज कॉमेडी, रोस्टिंग किंवा मनोरंजक विडिओ बनविणाऱ्या लोकांएवढीच पब्लिक त्याच्या चॅनलवर असते, वावरून त्याचे यश किती मोठे आहे याचा अंदाज येईल.

भावाला अधूनमधून प्रचंड ट्रोल केले जाते. त्यावर मीमही बनतात. पण तो काही आपला ट्रॅक सोडत नाही. हलक्याफुलक्या भाषेत आणि अधून मधून मजाक मस्ती करत तो आपले विडिओ तयार करत असतो. याचा थेट फायदा त्याला होत आहे. २०१७ साली त्याने गौरव चौधरी या नावाने अजून एक युट्यूब चॅनेल सुरू केले आहे. त्यात तो त्याची शॉपिंग, त्याचा प्रवास, त्याचा अनुभव या गोष्टी मांडत असतो.

त्याचे यश यावरूनही कळेल की फोर्ब्ससारख्या मॅगझिनने त्याला 30 अंडर 30 मध्ये समाविष्ट केले आहे. त्याची एकूण संपत्ती ही ३५० कोटी असल्याचे अनेक वेबसाईटसने नोंदवले आहे. पण हा सगळा पैसा युट्यूबमधून आलेला नाही, तर तो दुबई पोलिसांना सिक्युरिटी इक्विपमेंट सप्लाय करण्याचा व्यवसाय करतो, त्यामध्ये पण त्याची तगडी कमाई होत असते.

युट्युबचा वापर डोक्यालिटी लावून केला तर ते तुम्हाला देशात ओळख मिळवून देऊ शकते, तसेच कमी वयात श्रीमंतही करू शकते. मात्र त्यासाठी गौरव चौधरी यांच्यासारख्या लोकांप्रमाणे स्मार्टवर्क आणि हार्डवर्क दोन्ही गोष्टींचा पुरेसा वापर करता यायला हवा.

उदय पाटील