भोपाळमधील ‘हबीबगंज’ रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात आलं आहे. आता या रेल्वे स्टेशनचे नावही बदलण्यात येणार आहे. भोपाळची शेवटची गोंड राणी कमलापती हिच्या नावाने आता हे रेल्वे स्टेशन ओळखले जाणार आहे. पण ही राणी कमलापती होती तरी कोण आणि ती कुठल्या काळात होऊन गेली हे तुम्हाला माहित आहे का?
राणी कमलापती ही भोपाळची सर्वात शेवटची गोंड आदिवासी शासक होती. सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या या राणीचा पराक्रम आठवून आजही भोपाळवासियांचा ऊर अभिमानाने भरून येतो. राणी कमलापती ही गीनोरगड संस्थानचे शेवटचे शासक निझाम शाह यांची पत्नी होती. निझाम शाह यांना एकूण सात पत्नी होत्या, त्यात राणी कमलापती ही अत्यंत देखणी आणि शूर होती.
राजा निझाम शाह यांनी भोपाळच्या मोठ्या आणि छोट्या तलावाच्या काठावर तिच्यासाठी खास सात मजली महाल बांधून घेतला होता. याच महालातून उडी घेऊन राणीने आपली जीवनयात्रा संपवली होती. आत्मसन्मान आणि संस्कृती रक्षणासाठी तिने आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही म्हणूनच राणी कमलापती आजही भोपाळवासियांच्या अभिमानाचा विषय आहे. अशा या शूर राणीला मात्र उर्वरित भारतात फारसे ओळखले जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.
