२०००० फूट उंच युनाम शिखरावर स्वातंत्र्यदिनी फडकले ७५ ध्वजाचे ध्वज तोरण....

लिस्टिकल
२०००० फूट उंच युनाम शिखरावर स्वातंत्र्यदिनी फडकले ७५ ध्वजाचे ध्वज तोरण....

माउंट युनामच्या शिखरावर -२०००० ऊंचीवर स्वातंत्र्यदिनी फडकले ७५ ध्वजाचे ध्वज तोरण...
मुंबईचे गिर्यारोहक वैभव ऐवळे आणि त्यांच्या गिर्यारोहक मित्रांनी यावर्षी ७५ वा  स्वातंत्र्यदिन एका आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला.हिमाचल प्रदेशातील माउंट युनाम या शिखरावर त्यांनी तिरंग्याचे ७५ ध्वज तोरण फडकावले. याआधी गिर्यारोहक वैभव ऐवळे यांनी माउंट एल्ब्रस आणि माउंट किलीमांजारो वर भारताचा ७३ व ७२ वा स्वतंत्रता दिवस अनुक्रमे ७३ व ७२ ध्वजाचे ध्वज तोरण फडकावून साजरा केला होता. याची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून "Most Numbers Of  Indian Flags Hoisted On  Mount KILIMANJARO & Mount Elbrus" असा रेकॉर्ड वैभव यांच्या नावाने नोंदविला गेला आहे.बोभाटाचा हा लेख तुम्ही नक्कीच वाचला असेल.

वैभव ऐवळे यांनी रक्षाबंधना (२२ ऑगस्ट २०२१) निमित्ताने ही मोहीम भारतातील सर्व बहिणींना समर्पित केली असून  ह्या मोहिमेतून "Anti rape movement" ला आपला पाठिंबा दर्शीविला आहे.
आज बघू या त्यांच्या डायरीतल्या काही सचित्र नोंदी.
 

प्रवास माउंट यूनामचा:

प्रवास माउंट यूनामचा:

९ ऑगस्टला मनालीमधुन मोहीमेस सुरुवात झाली.१०ला केलॉंग 11 ला भरतपूर बेस कॅम्प(४५०० मी.) वर पोहचलो. १२ तारखेला बेस कॅम्प पासून अक्लमायटायजेशनसाठी (५२००मी.)वर जाऊन परत आलो. १३तारखेला बेस कॅम्पला माऊंटन पूजा करून परत कॅम्प १ ला आलो. तंबू  शिफ्ट केले.वातावरण खराब असल्याने वरच्या उंचीवर (हाइट गेन) जाता आले नाही.)
१४ तारखेला सकाळी हाइट गेन साठी निघालो. कॅम्प २ पर्यन्त जाऊन वापस३ वाजता कॅम्प १ ला येऊन लंच करून झोपी गेलो.

१५ ऑगस्ट उजाडला. मध्यरात्री १२.३० ला समीटसाठी निघालो. बाहेर खूपच थंडी होती,हलका हलका हिमवर्षाव होता. हेड टॉर्च लावून एक एक पाऊल समीटकडे पडत होतं. अंधाऱ्या रात्रीत त्या उणे तापमानात इतर क्लाइंबर्सही सोबत होते. जसजसा अल्टीट्युड (उंची) वाढत होता काहींना त्रास व्हायला सुरू झालेला.त्यामुळं त्यांना  मधूनच परतावं लागत होतं. 
मी स्वतःच्या तालात स्वसंवाद करत जात होतो. पाणी आणि ओआरएस घेण्यासाठी बॉटल काढली तर त्याचा पण बर्फ झालेला. थर्मास जवळ होतं त्यात एक लिटर हॉट वॉटर होत आणि ते मला जपून वापरायच होत. वाटेत बरेचजण थकून बसलेले दिसत होते.आतापर्यंत स्वमग्न तालात असलेल्या मला पण हलकासा थकवा जाणवायला लागला होता.

पहाटे साडेपाच वाजता सूर्योदय झाला आणि सूर्यकिरणांच्या प्रभेतून बघून एक प्रकारची उर्जा मिळाली.  सनग्लासेस काढण्यासाठी बॅगची चेन उघडायला गेलो तर ती पण फ्रीज झालेली. बॅगवर बर्फ जमा झालेला.समीट अजूनही लांब होतं. स्वेना आणि प्रणय सोबत होते.हेमराज दाई पुढे होते. त्यांना फॉलो करत आमची चढाई सुरू होता. पुढे पुढे खूप थकवा आला. थांबत थांबत मोठे श्वास घेत अभंग म्हणत एक एक स्टेप टाकत होती.

जसं जसं समीट दिसू लागलं तसं तसं भावुक होऊन डोळ्यात पाणी येऊ लागलेलं.
सकाळी ९ वाजता मी समीटवरती (६१११ मीटर) पोहचलो.
स्वेनानी मला सावरलं आणि आम्ही बाकी लोकांच्या मदतीने ७५ तिरंग्याचे ध्वजतोरण युनामवरती फडकवून राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्यदिन साजरा केला. ९.३० ला उतरायला  सुरुवात केली. दुसऱ्या टीम मधल्या २ जणांना AMS (Acute Mountaineering Sickness) झालेला. त्यांना रेस्क्यूमध्ये स्वेनाने हेल्प केली. आणि हळूहळू उतरत आम्ही दीड वाजता कॅम्प १ ला पोहचलो.