भाग ३- २०२२ सालचे फोर्ब्स 30 under 30!! पाहा या युवापिढीची गरूडझेप!!

लिस्टिकल
भाग ३- २०२२ सालचे फोर्ब्स 30 under 30!! पाहा या युवापिढीची गरूडझेप!!

आजची तरुण पिढी म्हणजे आळशी आणि फक्त मोबाईलमध्ये घुसलेली असा सूर सगळीकडे ऐकायला मिळतो. मोबाईलमध्ये घुसून गेम्स खेळणे आणि गप्पा मारणे. फोटो ,व्हिडीओ काढणे एवढ्याच गोष्टी मुलं करतात का? खरंतर ही नाण्याची एकच बाजू आहे.आज जग झपाट्याने बदलत आहे. नवनवीन टेक्नॉलॉजीचा आविष्कार होत आहे. आजची हुशार तरुणाई शिकून मिळालेल्या संधीचे सोने देखील करत आहे. आपापले कौशल्य दाखवून यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करत आहे. Quick and fast अशी ही पिढी आहे. आपल्या मेहनतीच्या, कल्पकतेच्या जोरावर आपले अस्तित्व सिद्ध करत आहे. म्हणूनच फोर्ब्स इंडियाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. फोर्ब्स 30 under 30 २०२२ची यादी जाहीर झाली आहे. आणि त्यात आपली भारतीय युवकांनी वर्चस्व सिद्ध केले आहे.

आपण या लेखमालिकेद्वारे थोडक्यात त्यांची आणि त्यांच्या कार्याची ओळख करून घेऊया...

श्रेया पटेल, संस्थापक - विंडो ड्रीम्स प्रॉडक्शन

श्रेया पटेल, संस्थापक - विंडो ड्रीम्स प्रॉडक्शन

श्रेया पटेल एक मॉडेल, अभिनेत्री , आणि चित्रपट निर्माती आहे. मनोरंजन क्षेत्रात ती काम करतेच, पण ती एक मानवाधिकार कार्यकर्तीही आहे. तिने आपले जीवन केवळ चित्रपट आणि फॅशनमधील व्यावसायिक करिअरसाठीच नाही तर सामाजिक कार्यासाठीही समर्पित केले आहे. तिचा पहिला चित्रपट, 'गर्ल अप' हा कौटुंबिक हिंसाचार आणि मानवी तस्करीवर आधारित होता. ज्याचे खुप कौतुक झाले. त्याची निर्मिती तसेच कथा, दिग्दर्शन ही तिनेच केले होते.
ती भारतीय ट्रान्सजेंडर राइट्स अँड एज्युकेशन या विषयावर Eakk नावाच्या माहितीपटावर देखील काम करत आहे.

श्लोक श्रीवास्तव, कंटेट क्रिएटर- टेक बर्नर

श्लोक श्रीवास्तव, कंटेट क्रिएटर- टेक बर्नर

श्लोक श्रीवास्तव यांनी आठ वर्षांपूर्वी YouTube व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली होती. त्याचे टेक बर्नर नावाचे चॅनल आहे. या मध्ये नवनवे इलेक्ट्रॉनिक गॅझेटस् कसे वापरायचे, त्याची दुरुस्ती किवा वापरायच्या युक्त्या त्यात सांगितल्या आहेत. या चॅनलचे लाखो फॉलोअर्स आहेत. विशेष करून तरुणांमध्ये हे चॅनल खूप लोकप्रिय आहे.

रवीश अग्रवाल, स्वतंत्र कुमार आणि सिद्धार्थ श्रीवास्तव - एबल जॉब्स

रवीश अग्रवाल, स्वतंत्र कुमार आणि सिद्धार्थ श्रीवास्तव - एबल जॉब्स

एबल जॉब्स हा एक पदवीधरांसाठी प्रशिक्षण आणि नोकरी देणारा प्लॅटफॉर्म आहे. २०१९ मध्ये रवीश, स्वतंत्र आणि सिद्धार्थ या तिघांनी नोकरीसाठी लागणारे कौशल्य कसे विकसीत करावे यासाठी प्रशिक्षण देणे सुरु केले. एबल जॉब्स फक्त प्रशिक्षण नाही, तर नोकरीची ही हमी देतो. या नोकऱ्या मार्केटिंग, सेल्स आणि ऑपरेशन्स अशा प्रकारच्या असतात. आतापर्यंत यांच्या प्रशिक्षणामुळे २५ हजार हून अधिक लोकांना काम मिळाले आहे. एबल जॉब्सचे स्वप्न आहे की भारतात एकही पदवीधर नोकरीशिवाय राहू नये. पुढच्या काळातही या माध्यमातून अनेकांना प्रशिक्षण आणि नोकरी देण्याचे काम ते करणार आहेत.

श्रेयांस संचेती आणि हरीश उदयकुमार, सहसंस्थापक - ब्लूलर्न

श्रेयांस संचेती आणि हरीश उदयकुमार, सहसंस्थापक - ब्लूलर्न

ब्लूलर्न हा एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. हरीश उदयकुमार आणि श्रेयांस संचेती यांनी महाविद्यालयात असताना हा उपक्रम सुरु केला होता. त्यांनी आधी एक टेलीग्राम ग्रुप तयार केला होता. त्यात विद्यार्थी त्यांच्या समस्या मांडायचे. त्याची उत्तरे इतर विद्यार्थी द्यायचे. हळूहळू हा ग्रुप वाढत गेला. सध्या ब्लूलर्न प्लॅटफॉर्म १४ देशांत आणि ४२०० विद्यार्थांपर्यंत पोहोचला आहे. अमेरिका,इंग्लंड,सिंगापूरचे युवकही यात आहेत. इथे फक्त नेटवर्कच नाही, तर तज्ञांकडून विनामूल्य मार्गदर्शनही केले जाते. आपल्या आवडीनुसार वेगवेगळे समूह आहेत, त्यातही सहभागी होता येते. ब्लूलर्नमध्ये सध्या 13 कर्मचारी आहेत.

झाशी एलांगो, सीईओ - HumBee

झाशी एलांगो, सीईओ - HumBee

HumBee हे एक डेटिंग ॲप आहे. बंगलूरुच्या झाशी एलांगो यांची ही कल्पना! या इथले ॲपच्या माध्यमातून एकमेकांशी ओळख करून त्यांच्याशी गप्पा मारता येतात. नाव न सांगता ही गप्पा मारता येतात. अनोळखी मुला मुलींना इथे एकमेकांशी संपर्क करता येतो. या ॲपची विशेषता म्हणजे हे इतर डेटिंग ॲप्सपेक्षा सुरक्षित आहे. मुख्य म्हणजे स्त्रियांची माहिती इथे गोपनीय ठेवली जाते. HumBee लॉन्च केल्याच्या पहिल्या आठवड्यातच २५०००० पेक्षा जास्त वापरकर्त्यांनी हे डाऊनलोड केले. त्यात ६० टक्के लहान शहरांतील महिला होत्या. HumBee ला भारतात प्रतिसाद मिळत आहे आता त्यांना संपूर्ण आशियामध्ये विस्तार करायचा आहे.

आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.

शीतल दरंदळे