इंग्लिश फलंदाजांचा घाम काढत बुमराहने रचले एक नव्हे तर अनेक विक्रम; पाहा यादी...

इंग्लिश फलंदाजांचा घाम काढत बुमराहने रचले एक नव्हे तर अनेक विक्रम; पाहा यादी...

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, त्याला बुम बुम बुमराह का म्हणतात. इंग्लंडविरुद्ध (India vs England) झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात बुमराह इंग्लिश फलंदाजांवर असा काही बरसला की, त्यांना सावरण्याची देखील संधी मिळाली नाही. भारतीय संघाने हा सामना १० गडी राखून आपल्या नावावर केला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने ६ गडी बाद करत अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. कुठले आहेत ते विक्रम चला पाहूया.

जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीचा अंदाज आपण याच गोष्टींवरून लावू शकतो की, त्याने बाद केलेल्या ६ फलंदाजांपैकी ३ फलंदाजांना खाते देखील उघडता आले नाही. यासह वनडे क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडमध्ये जाऊन वनडे क्रिकेटमध्ये ६ गडी बाद करणारा जसप्रीत बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. इतकेच नव्हे तर आशिया खंडाच्या बाहेर कुठल्याही भारतीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. (Records made in india vs England match) 

जसप्रीत बुमराहच्या वनडे क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने दोन वेळेस एकाच डावात पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने १९ धावा खर्च करत ६ गडी बाद केले आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये पलेकल्लेमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने २७ धावा खर्च करत ५ गडी बाद केले होते.

भारतीय संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे गोलंदाज 

स्टुअर्ट बिन्नी - ४ धावा खर्च करत ६ गडी बाद , बांगलादेश (२०१२)

अनिल कुंबळे - १२ धावा खर्च करत ६ गडी बाद , वेस्ट इंडिज (१९९३)

जसप्रीत बुमराह - १९ धावा खर्च करत ६ गडी बाद, इंग्लंड (२०२२)

आशिष नेहरा - २३ धावा खर्च करत ६ गडी बाद, इंग्लंड (२००३)

कुलदीप यादव - २५ धावा खर्च करत ६ गडी बाद, इंग्लंड (२०१८)

इंग्लंडमध्ये भारतीय गोलंदाजांनी केलेली सर्वोत्तम कामगिरी 

जसप्रीत बुमराह - १९ धावा खर्च करत ६ गडी बाद, इंग्लंड (२०२२) 

कुलदीप यादव - २५ धावा खर्च करत ६ गडी बाद, इंग्लंड (२०१८)

वेंकटेश प्रसाद - २७ धावा खर्च करत ५ गडी बाद, पाकिस्तान ( १९९९)

रॉबिन सिंग - ३१ धावा खर्च करत ५ गडी बाद (१९९९)

रवींद्र जडेजा - ३६ धावा खर्च करत ५ गडी बाद, वेस्ट इंडिज (२०१३)

कपिल देव -४३ धावा खर्च करत ५ गडी बाद, ऑस्ट्रेलिया(१९८३)

जसप्रीत बुमराहला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र पहिल्या वनडे सामन्यात त्याने जोरदार कमबॅक केले आहे. भारतीय संघाला जर ही मालिका जिंकायची असेल तर जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे.