कालबेलिया हा नाचाचा प्रकार जगभरात लोकप्रिय करणाऱ्या गुलाबो सपेरा यांची ही गोष्ट. प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता आणि कुठल्याही प्रकारच्या सामाजिक दडपणाला बळी न पडता आपलं काम सुरू ठेवणं या गुणांच्या बळावर त्यांनी अक्षरश: शून्यातून सर्वस्व निर्माण केलं आहे. गुलाबो यांनी आजवर १६५ पेक्षा अधिक देशांचा दौरा करून आपल्या कलेचा प्रसार केला आहे. २०१६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं.
जन्मानंतर जमिनीत जिवंत गाडली गेली, त्याच गुलाबो सपेराला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं!!


गुलाबोचं खरं नाव धन्वंतरी.गोरीपान आणि गुलाबी गाल असलेल्या धन्वंतरीला गुलाबो हे नाव तिच्या वडिलांनी दिलं. तिच्या विलक्षण आयुष्याला सुरुवात झाली तीही विलक्षण अशा एका घटनेने.जन्मानंतर काही मिनिटांतच तिला जमिनीत पुरण्यात आलं. राजस्थानमधल्या कालबेलिया या भटक्या जमातीची तशी प्रथाच होती. एरवी गावाबाहेर वसाहत करून राहणारी, घरात अठराविश्वे दारिद्र्य असलेली ही जमात जन्माला आलेलं अपत्य मुलगी असेल तर तिला डोक्यावरचा बोजा समजून जिवंत पुरत असे. कालबेलिया हा शब्द काल म्हणजेच मृत्यू देवतेचं प्रतीक असलेल्या सर्पावरून आलेला आहे. जमातीच्या नियमांबद्दल अनभिज्ञ असलेल्या तिच्या आईने आपल्या या चौथ्या मुलीला वाचवण्यासाठी अंधारात जाऊन तिला जमिनीखालून बाहेर काढलं. आश्चर्य म्हणजे पाच तास जमिनीखाली राहिल्यानंतरही ही मुलगी अजून जिवंत होती.
ही घटना घडली त्या दिवशी धनत्रयोदशी होती. गुलाबोचा जन्म झाला त्यावेळी तिचे वडील बाजारात गेले होते. तीन मुलींच्या पाठीवर चौथीही मुलगी झाली तेव्हा कुटुंबावर अजून एक बोजा असं म्हणत तिच्या आईच्या सुटकेसाठी आलेल्या दायांनी तिला जमिनीत पुरलं. आईने मात्र तिला जीवदान दिलं. त्यानंतर पंचायत बोलवली गेली. यावेळी समाजाचे नियम न पाळल्याबद्दल तिच्या कुटुंबाला बहिष्कृत केलं गेलं, पण जातीबाहेर काढल्यानंतरही वडिलांनी आपला पवित्रा बदलला नाही हे विशेष.

मात्र या घटनेनंतर वडिलांच्या मनात एक प्रकारची भीती बसली. कोणत्याही क्षणी लोक गुलाबोला ठार मारू शकतात हे त्यांना ठाऊक होतं. मग तिला वाचवण्यासाठी वडील तिला आपल्या बरोबर घेऊन बाहेर पडू लागले. अजमेर जवळच्या कोटदा नावाच्या छोट्याशा गावात गुलाबोचं कुटुंब राहायचं. वडील गारुडी होते. ते सापाचे खेळ करत गावोगावी फिरायचे. आपली कला सादर करण्यासाठी जयपूर आणि इतर मोठ्या मोठ्या शहरांना भेटी द्यायचे. हे सापांचे खेळ बघतच गुलाबो लहानाची मोठी झाली. सापांच्या सहवासात राहिल्याने तिला सापांबद्दल कधीही भीती वाटली नाही. उलट ती त्यांच्याशीच खेळायची. लोकांनी सापाला दिलेलं दूध वडील तिला देत असत. सतत सापांचे खेळ बघून ती खूप लवकर सापांप्रमाणेच नाच करायला शिकली. अर्थातच लोकांनी याला विरोध केला. कारण मुलींनी अशा प्रकारे नाच करणं निषिद्ध होतं. अखेरीस आपल्याला गावाबाहेर काढू नये म्हणून वडील तिला सक्तीने घरात कोंडून बाहेर पडायला लागले.

काही वर्षं गेली. आयुष्य त्याच्या त्याच्या गतीने पुढे सरकत होतं. गुलाबो सात वर्षांची झाली. त्याच वेळी तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग आला. पुष्करच्या मेळ्यात ती नाच करत असताना राजस्थान पर्यटन विभागाच्या तृप्ती पांडे आणि हिंमत सिंग यांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं. या मुलीत विशेष काही तरी होतं. नाचत असताना तिचं शरीर अक्षरशः सापासारखं लवलवत होतं. नृत्यामध्ये एवढी लवचिकता त्यांनी यापूर्वी कधीही बघितलेली नव्हती. जणू तिच्या शरीरात एकही हाड नव्हतं! अर्थात हे सगळं तिच्यासाठी अत्यंत नैसर्गिक, साहजिक होतं. पर्यटन विभागाने तिला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली, आणि तिथूनच तिच्या आयुष्याने एक अनपेक्षित वळण घेतलं. टीव्हीवरच्या कार्यक्रमांमधून गुलाबो झळकायला लागली. त्यातूनच तिला परदेशांमध्ये जाऊन आपले कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. वयाच्या बाराव्या वर्षी वॉशिंग्टन डीसी इथे तिला आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यावेळी भारत सरकारने भारतीय पारंपरिक नृत्याचा अमेरिकेत प्रसार करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता.
सापासारख्या लवचिक हालचालींचा अंतर्भाव असलेलं कालबेलिया नृत्य ही गुलाबोने जगाला दिलेली देणगी. या नृत्यातल्या मनमोहक आणि लयबद्ध हालचाली पाहताना डोळ्याचं पारणं फिटतं. यासाठी तिने एक गाणं तयार केलं आहे. शिवाय तिची निर्मिती असलेली काळ्या रंगाची घागरा चोळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असा रंगीबेरंगी दुपट्टा ही कालबेलिया नृत्याची ओळख बनली आहे.
तिच्या आजवरच्या प्रवासात अनेक वळणं आली. अशाच एका वळणावर तिचा आधार असलेले वडील तिला सोडून गेले. त्यावेळी तिचं वय अवघं सतरा वर्षांचं होतं आणि ती अमेरिकेच्या दौऱ्यावर निघणार होती. मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या जमातीच्या लोकांनी तिला बाहेर पडायला विरोध केला. त्यांच्या मते जमातीच्या प्रथेप्रमाणे तिने तेरा दिवस सुतक पाळायला हवं होतं. मात्र गुलाबोच्या वडिलांनी ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर संघर्ष केला होता त्याच गोष्टींना अशाप्रकारे अनुसरणं तिला मान्य नव्हतं. त्यामुळे आपल्या वडिलांचा कित्ता गिरवत तिने समाजाच्या दडपणाला बळी न पडता अमेरिकेला जायचं ठरवलं.

एक मात्र आहे, ज्या समाजाकडून तिला आणि तिच्या कुटुंबाला बहिष्कार आणि अवहेलना सहन करावी लागली तोच समाज आता तिचा सन्मान करतो. आपल्या मुलींपुढे तिचा आदर्श ठेवू पाहतो. जन्माला येणारं अर्भक जर मुलगी असेल तर आता तिला जमिनीत पुरलं जात नाही. उलट त्यांच्या समाजाच्या मुली आता शिकत आहेत आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहात आहेत. स्वतः गुलाबोची सर्वात मोठी मुलगी राजस्थानी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते, तर दुसरी मुलगी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहे.
कोणे एके काळी गावाच्या वेशीबाहेर लहान पालांमध्ये राहणाऱ्या गुलाबोची आता जयपूर, डेन्मार्क, फ्रान्स अशा ठिकाणी घरं आहेत. दर तीन महिन्यांनी ती सपेरा डान्स शिकवण्यासाठी फ्रान्स आणि डेन्मार्क येथे जाते. तिथे तिथे हजारो विद्यार्थी आहेत. तिने अनेक फ्रेंच कलावंतांबरोबर एकत्र काम केलं आहे. फ्रान्समधल्या एका रस्त्यालाही तिचं नाव आहे.
कोरोना महासाथीच्या काळात तिने लोककलावंतांना सढळ हाताने मदत केली. त्यासाठी वाळवंटाच्या पार अंतर्भागात जाऊन तिने त्यांना साहाय्य केलं. आता तिचं फार पूर्वीपासूनचं स्वप्न गुलाबी संगीत संस्थान स्कूलच्या स्वरूपात साकारत आहे. प्रत्येक घरात तिला एक तरी गुलाबो हवी आहे, जी कालबेलिया नृत्यपरंपरा पिढ्यानपिढ्या जिवंत ठेवण्यास मदत करेल.
स्मिता जोगळेकर