कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी जगभरात अनेक ठिकाणी पुरस्कार प्रदान केले जातात.जगाच्या कानाकोपऱ्यातील खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारी पाककला तरी याला अपवाद कशी असेल. आपल्या देशाच्या खाद्यसंस्कृतीला जागतिक स्तरावरही पुरस्कार मिळवून देणाऱ्या मेहेरवान इराणी यांच्या चायपानीला यंदाचा जेम्स बिअर्ड ॲवॉर्ड मिळाला आहे.मेहेरवान इराणी हे स्वतः एक उत्तम शेफ आहेत. अमेरिकेच्या नॉर्थ करोलायना भागात त्यांनी भारतीय पद्धतीचे एक रेस्टॉरंट सुरु केले. त्याचे नाव आहे, चायपानी!
थेट अमेरिकेत पुरस्कार मिळवणारे 'चायपानी' आहे कुठे? तिथे काय मिळते आणि ते चालवते कोण?


अमेरिकेतील जेम्स बिअर्ड फौंडेशन ही संस्था पाककलेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जागतिक पुरस्कार प्रदान करते. या संस्थेकडून दिला जाणारा हा पुरस्कार खाद्यपदार्थांच्या क्षेत्रातील एक मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारामुळे हे रेस्टॉरंट अमेरिकेतील एक आगळेवेगळे आणि दर्जेदार रेस्टॉरंट असल्याचे सिद्ध होते.
२००९ रोजी ॲशव्हीले परिसरात सुरु झालेल्या या रेस्टॉरंटमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातील विविध भारतीय पदार्थांची अस्सल चव चाखता येते. तेही अगदी कमी खर्चात!
चायपानी या नावावरूनच इथल्या पदार्थांची अस्सल भारतीय चव जास्त स्पष्ट होते. अमेरिकेतील या रेस्टॉरंटमध्ये अगदी पाणीपुरी पासून इडली रस्समपर्यंत सर्व प्रकारचे भारतीय पदार्थ बनवले जातात.

१३ जून २०२२ रोजी जेम्स बिअर्ड ॲवॉर्डचे वितरण करण्यात आले. यापूर्वी २०२० आणि २०२१ मध्ये कोरोना आणि जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन रेस्टॉरंट्स बंद होते. त्यामुळे हे पुरस्कारही स्थगित करण्यात आले होते. या पुरस्कार स्वीकारताना रेस्टॉरंट्स हे विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतीला जोडणारा एक दुवा आहे, असे मत मेहेरवान इराणी यांनी व्यक्त केले. यापूर्वीही तब्बल पाच वेळा मेहेरवान इराणी आणि त्यांच्या चायपानी रेस्टॉरंटचे या पुरस्कारासाठी नामांकन झाले होते.
समस्त भारतीयांसाठी ही एक अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे की, अमेरिकेतही भारतीय खाद्यपदार्थांची दखल घेतली जात आहे आणि भारतीय खानसामे भारतीय खाद्यपदार्थांना जगभरात ओळख मिळवून देत आहेत. अमेरिकेतही इडली सांबर, पाणीपुरी आणि चहा-भजीवर ताव मारला जात आहे. आहे की नाही गंमत!
मेघश्री श्रेष्ठी