कुत्रा हा माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र मानला जातो. जशा त्याच्या प्रामाणिकपणावर अनेक गोष्टी लिहिल्या जातात, तसेच त्याच्या हुशारीबद्दल ही लिहिले गेले आहे. पाळीव कुत्र्याला काही सवयी शिकवल्यावर तो हुशारीने वागतो. पण रस्त्यावरच्या एका भटक्या कुत्राला कोणीही न शिकवता तो मेट्रो, बस या सार्वजनिक वाहनातून प्रवास करतो असे सांगितले तर आश्चर्य वाटेल ना? आज अशाच एका कुत्र्याची बातमी आज आम्ही सांगणार आहोत.
हा कुत्रा इस्तंबूलमध्ये आहे. त्याचे नाव बोजी. सध्या हा सोशल मीडिया स्टार बनला आहे. तिथे लोक कुतूहलाने त्याच्याकडे पाहतात. इस्तंबूलच्या बस, ट्राम, मेट्रो यांमध्ये तो प्रवास करताना दिसतो. त्याला ट्रेन आणि फेरींमधून कसे चढायचे आणि बाहेर कसे जायचे हे चांगलेच माहित आहे. लोक त्याला रोजच्या प्रवासात पाहून चकित झाले. तो कोणालाही त्रास देत नाही. सीटवर बसून राहतो आणि जिथे थांबा असेल तिथे उतरून निघून जातो. बोजी इतका प्रसिद्ध झालाय की प्रवास करताना प्रवासी त्याच्यासोबत सेल्फी घेतात.


