ही गोष्ट आहे एका मनस्वी माणसाची. एका अर्थाने त्याचा हा मनस्वी स्वभावच त्याला भोवला. त्याच्याच एका चाहत्याला त्याची मतं पटली नाहीत. ती स्वीकारायचा प्रगल्भपणाही दाखवता आला नाही. त्यातून त्याचा चक्क खून झाला. तो तसं बरंच काही करायचा. गाणी लिहायचा, गायचा देखील. त्यातून त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. एक ना एक दिवस अख्खं जग एक होईल, देशांच्या सीमा पुसल्या जातील वगैरे वगैरे स्वप्नं पाहिली होती त्याने. काही प्रमाणात त्याने हे खरंही करून दाखवलं. देशोदेशींच्या सीमांचा अडथळा येऊ न देता जगभरातले असंख्य लोक त्याचे चाहते बनले. जिथे माणसाला फक्त माणूस म्हणूनच वागवलं जाईल, धर्माच्या भिंती नसतील असं जग असावं असं त्याचं स्वप्न होतं. पण वास्तवातलं जग यापेक्षा खूप वेगळं होतं. या माणसाचं नाव होतं जॉन लेनन.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडमधल्या लिव्हरपूल शहरावर जर्मन सैन्य सातत्याने बॉम्ब वर्षाव करत होतं. ही १९४० मधली गोष्ट. त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त काळ शेल्टर होम मध्ये काढावा लागत होता. जॉनचा जन्म याच काळातला. आई-वडील विभक्त झाल्यामुळे जॉनला त्याच्या एका नातेवाईकांनी सांभाळलं. पण त्यांच्या घरात शिस्तीची अनेक बंधनं होती. या बंधनांमध्ये घुसमटत जॉनचं बालपण सरलं. या काळात त्याची संगीताशी मैत्री झाली.



