कोव्हीडमुळे आपण घरात बसायला लागलो त्याला आता दीड वर्ष झालं. शाळाकॉलेजेस बंद, क्लासेस बंद, ऑफिसला जायचं तरी अधूनमधून. घरी बसण्याचा कितीही कंटाळा आला तरी पर्याय नाही. सध्या ऑफिस, शाळा, कॉलेज, क्लास, आणि मुख्यतः या ठिकाणी होणारं सोशलायझेशन याचीच बहुतेक लोकांना सगळ्यात जास्त गरज भासत आहे. प्रत्यक्षात नाही तरी टीव्हीवर वगैरे कॉलेजचा एखादा सीन दिसला तरी बरं वाटणारे, त्या आठवणींनी नॉस्टॅल्जीक होणारेही अनेकजण आहेत. त्यामुळेच कदाचित नेटफलिक्सवरील कोटा फॅक्टरी सीझन २ ही मालिका सुरुवातीला आशादायक वातावरण निर्माण करते. कोटा येथील महेश्वरी क्लासेस, डोळ्यांत असंख्य स्वप्नं घेऊन तिथे आलेले विद्यार्थी, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा हा सगळा माहौल डोळ्यांना सुखावून जातो. आधीच्या सीझनमध्ये या मालिकेतलं देखणेपण, वास्तवाच्या जवळ जाणारी गोष्ट, कलाकारांचा उत्तम अभिनय अशी भट्टी चांगली जमलेली असल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा अजूनच उंचावतात. पण ...
हा 'पण' बराच बोलका आहे.
आयआयटी, त्याभोवती गुंफलेली स्वप्नं, त्यासाठी घ्यायची मेहनत, त्यासाठीची गळेकापू स्पर्धा, आशा-निराशा आणि जय-पराजय यांचा खेळ हा सध्याच्या लेखकांसाठी हिट टॉपिक आहे. यावर थ्री इडियट्ससारखा सिनेमाही येऊन गेला. कोटा फॅक्टरी या मालिकेचा पहिला सीझनपण यावरच आधारित आहे. पण सीझन १ मुळे अपेक्षा उंचावल्या तरी दुसरा सीझन अळणी, बेचव, पचपचीत वाटतो. एखादीला पोळ्या उत्तम जमल्यावर पुढच्यावेळी तिच्याकडून पुरणपोळीची अपेक्षा करणं आणि तिने पुरणपोळी तर जाऊच दे, पोळीही धड न करणं असा हा प्रकार आहे.



