समुद्राचा अथांग किनारा कोणाला आवडत नाही? पायांना धडकणाऱ्या लाटा आणि दूरवर मावळणारा सूर्य. हा अनुभव खूप आनंद देणारा असतो. फिरायला म्हणून समुद्रावर जाणे वेगळे आणि कामासाठी रोज समुद्राच्या पाण्यात उतरणे वेगळे. मासेमारी असेच काम असते. समुद्राच्या पाण्यात अनेक वेगवेगळे मासे असतात, यावर मासेमारांचे जीवन अवलंबून असते. कितीतरी कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर चालू असतो. पहाटे यांचा दिवस चालू होतो, लाटांवर बोट नेऊन योग्य ठिकाणी जाळे फेकून मासे पकडणे आणि ते विकणे. हे जितके दिसते तितके सोपे काम नाही. खूप कष्टाचे काम आहे, नशीबाचीही साथ लागते. एखादे दिवशी जाळ्यात बरेच मासे सापडतात तर एखादे दिवशी काहीच मिळत नाही.
भारताच्या पहिल्या परवानाधारक महिला मासेमार!! परवाना मिळण्यासाठी या कठीण परीक्षा द्यायला लागतात!!


मच्छिमार म्हणलं की डोळ्यासमोर येतो तो एक एक पुरुष मच्छिमार. यांच्याकडे मासे पकडण्यासाठी परवानाही असतो. पण तुम्ही महिला मच्छिमाराबद्दल ऐकले आहे काय? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की केरळच्या के.सी. रेखा या भारताच्या पहिल्या परवानाधारक मासेमार आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवर कोणत्याही महिलेला असा परवाना मिळाला नव्हता. समुद्रातून मासे पकडणे सर्वात कठीण काम मानले जाते. पुरुष शतकांनुशतके हे काम करत आहेत, पण केरळच्या के.के.सी. रेखा यांनी ही धारणा मोडून दाखवली. ४५ वर्षांच्या के. सी. रेखा केरळ राज्यातील त्रिचूर जिल्ह्यातल्या 'चावक्कड' गावच्या रहिवासी आहेत. त्या अरबी समुद्रात मच्छीमार म्हणून काम करतात. रेखा यांचे कुटुंब या व्यवसायात आधीपासूनच आहे पण त्यांनी याप्रकारे समुद्रात उतरण्याचा कधीच प्रयत्न केला नव्हता. पण २००४साली आलेल्या त्सुनामीनंतर त्यांचे जीवनच बदलले. त्यांचे पती पी. कार्तिकेयनचे दोन्ही साथीदार काम सोडून गेले. नव्या कामगारांना देण्यासाठी पैसे नव्हते. एकट्याने मासेमारी शक्य नव्हते. रेखा यांना शाळेत जाणाऱ्या मुली आहेत. पैसे नसल्याने त्यांचे शिक्षण सुटायची वेळ आली होती. घरखर्च भागवणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत रेखा यांनी त्यांच्या पतीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. हा धाडसी निर्णय घेतल्यावर त्यांनी पतीकडून काम शिकण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना जाणवले की समुद्रकिनारी फिरणे वेगळे आणि प्रत्यक्षात पाण्यात उतरणे हे किती अवघड असते. पण त्या घाबरल्या नाहीत. मच्छीमारांच्या कुटुंबात 'कदलमा' देवीची विशेष पूजा केली जाते. 'कदलमा' देवीच्या कृपेने सर्व व्यवस्थीत झाले. आजही त्या कामाला निघाल्यावर देवीचा आशीर्वाद घेतात.

नंतर त्यांनी रेखा यांच्यासाठी परवाना मिळवण्यासाठी प्रयत्न केले. खरं तर, कोणत्याही मच्छिमाराला परवानाधारक होण्यासाठी अनेक परीक्षांतून जावे लागते. मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना हवामान, समुद्राबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आतले मार्ग, सागरी सीमा, वेळा याची माहिती असावी लागते. विशेषतः, देशाच्या सागरी सीमेची मर्यादा कुठे आहे हेही कळणे आवश्यक आहे. याबरोबरच समुद्रात गंभीर परिस्थिती आलीच तर त्या परिस्थितीत नौका चालवण्याचा अनुभवही लागतो. म्हणजेच समजा अचानक वादळ आले किंवा मोठया लाटा आल्या तर त्याने सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचणे गरजेचे असते. त्याला माशांची चाचणी करणे देखील आवश्यक असते. असे कितीतरी अवघड नियमांची लांबलचक यादी असते. जेव्हा हे सर्व करण्यात सक्षम आहात सिद्ध होते त्यानंतर सरकारी अधिकारी पाहतात, आणि परवाना मिळतो. रेखा यांनी या सर्व अवघड परीक्षा पास केल्या आणि त्यांना अखेर परवाना मिळाला.

केरळच्या राज्य मत्स्य व्यवसाय विभागाने रेखाला 'डीप सी फिशिंग लायसन्स' दिले आहे. हा परवाना मिळाल्यानंतर प्रीमियर मरीन रिसर्च एजन्सी 'द सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट'ने रेखाचा सन्मानही केला आहे. आपल्या पतीबद्दल बोलताना कार्तिकेयन म्हणतात की त्यांना त्यांच्या पत्नीचा अभिमान आहे. ती खरोखरच धाडसी आहे. तिने मला खूप पाठिंबा दिला. जर ती न घाबरता माझ्याबरोबर समुद्रात गेली नाही तर मला माहित नाही की माझ्या कुटुंबाचे काय झाले असते!"
भले परिस्थितीमुळे रेखा यांनी हा निर्णय घेतला असेल, पण असे काम करणाऱ्या रेखा एखाद्या रणरागीणीपेक्षा कमी नाहीत. महिला सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरीबरीने काम करत आहेत. के.सी. रेखा यांनी जी धडाडी दाखवली त्याबद्दल खरंच त्यांचे कौतुक आहे.
शीतल दरंदळे