त्याला गाड्यांची प्रचंड आवड होती. वेगाचा थरार, कोणत्याही बंधनाशिवाय जगण्याची उमेद, कॅलिफोर्नियातल्या माॅडेस्टोमध्ये रात्रीच्या वेळी मुलींवर इंप्रेशन मारण्याची संधी किंवा इतर कार उत्साहींना शर्यतीसाठी शोधणे ह्यात त्याचे तारूण्याचे दिवस उडून जात होते. १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात तो थॉमस डाउनी हायस्कूलमध्ये दाखल झाला तेव्हा त्याला एक रेसर मोटारसायकल मिळाली. ती घेऊन तो अख्खा गाव हिंडला. मग वडिलांच्या मागे लागून त्याने कार घेऊन देण्याची गळ घातली. त्यांनी देखील लाडाने एक लहान, दोन-सिलेंडर इंजिन असलेली पिवळ्या रंगाची ऑटोबियंची बियान्चिना त्याला घेऊन दिली.
आपल्या नव्या कारला घेऊन लुकास ताबडतोब स्थानिक गॅरेजमध्ये गेला आणि कामाला लागला. कारण त्या साध्या कारला त्याला बनवायचं होतं रेसिंग कार! शक्तिशाली इंजिन, रेसिंग बेल्ट इत्यादी लावल्यावर त्याची बियांचिना कार म्हणजे छोटं रॉकेट बनलं, आणि लुकास संपूर्ण शहरात ती कार वेगाने चालवू लागला. पोलिसांचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले नसते तर नवलच. लुकासने त्याचे ड्रायव्हिंगचे कौशल्य प्रादेशिक शर्यतींमध्ये आजमावून पाहिले आणि काही स्पर्धा जिंकल्या देखील.
शाळेत असताना लुकास अत्यंत सामान्य कुवतीचा मुलगा होता. आपल्या मुलाला कौटुंबिक स्टेशनरीचा व्यवसाय करण्यात रस नसल्याबद्दल त्याचे वडील नाखूष होते. त्यामुळे घरातही तणावपूर्ण वातावरण होतं. लुकास व्यावसायिक रेस कार ड्रायव्हर बनण्याचं स्वप्न बघत होता; एक असं करियर, जे त्याला मोडेस्टोच्या बाहेरील रोमांचक जगात घेऊन जाईल.