शिवकुमार गुप्ता, अजय, अतुल आणि राजेशचे वडील, हे सहारनपूर येथे एक छोटी ‘गुप्ता अँड कंपनी’ चालवत होते. साबणचुरा विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. त्याचबरोबर एसकेजी मार्केटिंगतर्फे मादागास्कर आणि झांजिबार येथून मसाले आयात करून विकण्याचा देखील व्यवसाय होता. १९८० च्या दरम्यान शिवकुमार गुप्ता यांना दक्षिण आफ्रिका हा देश व्यावसायिकदृष्टया स्थिरसावर होण्यासाठी योग्य वाटला. त्यांच्या निरिक्षणानुसार त्यांनी काही आडाखे बांधले नि मुलांना सांगितले की काही वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकादेखील अमेरिकेइतकाच बलशाली होईल. त्यांच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवून अतुल गुप्ताने दक्षिण अफ्रिकेच्या भूमीवर व्यावसायिक जम बसवायचा या हेतूने पाऊल टाकले.
अतुलने संगणक विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केला होता. संगणक बनवणे, दुरुस्त करणे, हार्डवेअरचा मेंटेनन्स हे सर्व तो अभ्यासक्रमात शिकला होता. अतुलने अफ्रिकेत पाऊल ठेवले तो काळ असा होता जेव्हा आफ्रिकेने वर्णद्वेषातून बाहेर पडत नवे विचार अंगीकारण्याची तयारी दर्शवली होती. बाहेरून येणाऱ्यांसाठी जाचक अटी, बंधने नव्हती. त्यामुळे अतुल पाठोपाठ अजय आणि राजेश यांनीदेखील आफ्रिकेत जाऊन नशीब आजमवायचे ठरवले. १९९३ मध्ये अतुल गुप्ताने सहारा कम्प्यूटर्सची स्थापना केली. २०१६ मध्ये या कंपनीचा वार्षिक टर्न ओव्हर २२ मिलियन डॉलर्स होता आणि जवळजवळ १०,००० कर्मचारी तेथे काम करत होते. आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांचा मुलगा डुडुझेन आणि गुप्ता बंधूमधील शेंडेफळ राजेश यांची मैत्री होती आणि ते व्यावसायिक भागीदार देखील होते.