आपल्या प्रत्येकाच्या लहानपणात आपल्या मित्रांबरोबरच आपले साथीदार जर कोण होते तर ते म्हणजे आपल्याला टीव्हीवर किंवा कॉमिक्समध्ये दिसणारे सुपरहिरो! ना कुठले टेन्शन, ना कुठली चिंता. कॉमिक्समध्ये सुपरहिरोच्या कथा वाचून मोठी झालेली पण एक पिढी आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून कॉमिक्समध्ये खिळून बसण्याची पण वेगळी मजा होती.
आपण या सुपरहिरोंच्या सिरीयल, सिनेमे आणि कॉमिक्स वाचून मोठे झालेलो आहोत. विशेष म्हणजे आजही आपली ही आवड कमी झाली नाही. तितक्याच आवडीने आजही ते सिनेमे बघितले जातात. आपल्या आयुष्यात मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा प्रचंड मोठा वाटा आहे. आपले बालपण भन्नाट करणारे सुपरहिरो आयर्नमॅन, कॅप्टन अमेरिका, हल्क, स्पायडरमॅन हे सर्व मार्व्हलचे मार्व्हल्स (चमत्कार) आहेत.
मार्व्हलची प्रत्येक विशेषता आपल्याला आवडते. पोस्ट क्रेडिट सिनसाठी थांबतानाचे कुतूहल हे वेगळ्या स्तरावरचे असते. मार्व्हलचे एक वेगळे महत्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात आहे. ज्या लोकांनी विशेष असे मार्व्हलचे सिनेमे बघितले नाहीत, त्यांना देखील मार्व्हलबद्दल निश्चितच कुतूहल आहे. पण एक वेळ होती जेव्हा मार्व्हलने खूप वाईट दिवस बघितले आहेत, जेव्हा त्यांच्यावर कर्ज होऊन दिवाळखोर होण्याची वेळ आली होती. या सर्व अडचणींतून त्यांनी कशी भरारी घेतली हेच आज आपण वाचणार आहोत.







