कर्जत हे तसं सर्वांच्या परिचयाचं ठिकाण आहे. मुंबईशी रेल्वेने जोडले गेल्यामुळे कर्जत आज सुपरिचित आहे. या कर्जत परिसरात अनेक दुर्ग, घाटवाटा, लेणी इ. बरीच ऐतिहासिक ठिकाणं आहेत. परंतु या सर्वांमध्ये आपले वेगळेपण जपणारा भिवगड हा दुर्ग खास आहे. त्यामुळेच या लेखात आपण या भिवगडाच्या वेगळेपणाबद्दल जाणून घेऊ.
कर्जत या पुण्या-मुंबईच्या साधारणतः मध्यावर असणाऱ्या तसेच रेल्वेमार्गाने जोडल्या गेलेल्या तालुक्याच्या ठिकाणावरून भिवगड दुर्ग ८ किमी. अंतरावर वसला आहे. येथे येण्यासाठी रेल्वेने कर्जत स्थानकात उतरून तुम्हाला सहा आसनी रिक्षा मिळतात. 'वदप' आणि 'गौरकामत' ही या दुर्गाच्या पायथ्याची दोन गावे आहेत. या दोन्ही गावातून आपल्याला या दुर्गावर चढाई करता येते. आपण जाताना गौरकामतकडील वाटेने चढाई करावी व उतरताना वदपकडील वाटेने उतरावे, असे केल्यास आपल्याला हा दुर्ग उत्तमप्रकारे पाहता येतो व आपली गडफेरी सुद्धा पूर्ण होते.


