नोकरी करत असताना सुट्टी मिळणे ही नेहमीच सोपी गोष्ट असते असे नाही. आपण शाळेत असल्यापासून सुट्टी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आलो आहोत. त्यात होते काय, अनेकदा खरे कारण असेल तरी ते बॉसला काही पटत नाही. मुंबईतील एका ठिकाणी नोकरी करणाऱ्या व्यक्तीची हीच पंचाईत झाली. पण मुंबई तर मुंबई आहे, या भाऊंच्या मदतीला चक्क अनोळखी लोक धावून आले.
लोकलने कामाला जाणाऱ्या लोकांसाठी पावसाळ्यात हाल होणे तसे नेहमीच. कधी काय अडचण येईल सांगता येत नाही. या गाड्यांचे वेळापत्रक आणि त्यांची चालू बंद परिस्थिती सांगण्यासाठी काही ऍप तयार करण्यात आले आहेत. असेच एक एम इंडीकेटर नावाचे ऍप आहे. ट्रेन, बस आणि मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रत्येक मुंबईकराच्या मोबाईलमध्ये हे ॲप असतेच असते.
या नोकरदार भाऊंना गोरेगावच्या पुढे लोकल बंद असल्याचे समजले. पण बॉसला हे कारण खरेच आहे हे कसे सांगायचे हा पेच त्याच्यापुढे निर्माण झाला. मग भाऊंनी नामी डोक्यालिटी लढवली. त्यांनी या एम इंडिकेटर ऍपवर सरळ मॅसेज टाकला.
"माझ्या बॉसला लोकल बंद असल्याचे पटवून द्यायचे असून आपण लोकल खरंच बंद असल्याचे सांगावे जेणेकरून बॉसला हा स्क्रीनशॉट शेअर करता येईल." यावर या ॲपवर असलेल्या अनेक लोक ज्यांना हा मॅसेजकर्त्याबद्दल काही माहिती नव्हती, त्यांनी एकापाठोपाठ एक सांगितले की लोकल खरेच बंद आहे.
मुंबईत अनेक नोकरी करणाऱ्या लोकांसाठी लोकल बंद असेल तर सुट्टी घेण्याव्यतीरिक्त पर्याय नसतो. कारण ऑफिस आणि घर हे अंतरच इतके जास्त असते की त्यावर दुसरे कुठले वाहन करून जाणे हे परवडण्यासारखे नसते. म्हणून सुट्टी घेणे हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर शिल्लक उरतो.
अशाप्रकारे बॉसचे समाधान होऊन त्यांना सुट्टी मंजूर झाली. त्यांनी या सर्व लोकांचे आभार मानले. लगोलग हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. लोकांनी या मुंबई स्पिरिटचे कौतुक करायला सुरूवात केली. मुंबईमध्ये एकमेकांना ओळखपाळख असो-नसो, फक्त गरज ओळखून कशाप्रकारे हात दिला जातो याचे हे उत्तम उदाहरण यानिमित्ताने समोर आले आहे.
उदय पाटील
