केवळ १ धाव अन् हुकला सूर्याचा मोठा विक्रम! हिटमॅनला टाकलं असतं मागे...

केवळ १ धाव अन् हुकला सूर्याचा मोठा विक्रम! हिटमॅनला टाकलं असतं मागे...


भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या टी -२० मालिकेत भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये जोरदार विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. ही मालिका भारतीय संघाने २-१ ने आपल्या नावावर केली. अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला असला तरीदेखील भारतीय संघासाठी एक सकारात्मक बाब समोर आली आहे. मध्यक्रमात फलंदाजी करणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात सुपर हिट ठरला आहे. या सामन्यात त्याने जोरदार शतक झळकावले आहे. मात्र केवळ १ धावांनी त्याचा मोठा विक्रम हुकला आहे.

सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) ने तिसऱ्या टी -२० सामन्यात ५५ चेंडूंमध्ये ११७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने १४ चौकार आणि ६ षटकार मारले होते. ही आक्रमक खेळी पाहून विरोधी संघातील गोलंदाज अडचणीत सापडले होते. या खेळी दरम्यान आणखी एक रन करताच त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडून काढला असता. टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वात मोठी वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम हा रोहित शर्माच्या नावे आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्ध (Srilanka) झालेल्या टी -२० सामन्यात ४४ चेंडूंमध्ये ११८ धावांची खेळी केली होती. मात्र सूर्यकुमार यादवला केवळ ११७ धावा करता आल्या. त्यामुळे रोहित शर्माचा विक्रम मोडून काढायला सूर्यकुमार यादवला एक रन कमी पडला.

इंग्लंड संघाने तिसऱ्या टी -२० सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी २१६ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील सुरुवातीचे ३ फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर सूर्यकुमार यादवने जबाबदारी घेत मोठे फटके खेळायला सुरुवात केली. त्याची फलंदाजी पाहून इंग्लिश प्रेक्षक देखील त्याचं टाळ्या वाजवून कौतुक करत होते. त्याने ४८ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले.