या गोष्टीला आता पाव शतकाहून अधिक काळ लोटला आहे. अगदी तारीखच सांगायची तर ३० नोव्हेंबर १९९४. त्रिवेंद्रममधील एका चिंचोळ्या गल्लीत एक पोलीस जीप शिरली आणि एका घरासमोर थांबली. त्यानंतर थोड्याच वेळात पोलिसांबरोबर एक व्यक्ती जीपकडे निघाली.
"मी पुढे बसायचं की मागे?" त्या माणसाने पोलिसांना विचारलं. अजूनही पोलीस आपल्याला का घेऊन जात आहेत? त्यांनी आपल्याला गुन्हेगार ठरवलं आहे का? या प्रश्नांची उत्तरं त्या माणसाला माहीत नव्हती. पोलीस सांगतील ते करायचं एवढंच त्याच्या हातात होतं. पण पोलिसांनी त्याला इतर गुन्हेगारांप्रमाणे जीपमध्ये मागे बसायला न सांगता पुढे बसायला सांगितलं आणि जीप पोलीस स्टेशनकडे निघाली.
ती व्यक्ती होती इस्रोचे नामवंत शास्त्रज्ञ नंबी नारायणन. इस्रोच्या क्रायोजेनिक रॉकेट इंजिन विभागाचे ते प्रमुख होते. रशियाकडून त्यासाठीचं तंत्रज्ञान मिळवणं ही त्यांची जबाबदारी होती. पोलीस स्टेशनला गेल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांना अटक झाल्याचं अधिकृतरित्या कळवण्यात आलं. गंमत म्हणजे ज्या पोलीस उपनिरीक्षकांनी त्यांना ठाण्यावर बोलवून घेतलं होतं ते त्या दिवशी आलेच नाहीत आणि संपूर्ण रात्र नंबी यांना त्यांची वाट बघत बाकावर झोपून काढावी लागली.




