पोलिसांचे काम हे आपल्या आयुष्यात येणाऱ्या विविध संकटांत आपल्याला मदत करण्याचे असते. पोलीस विविध आघाड्यांवर करत असलेल्या प्रामाणिक कामांमुळे आपण आपली रात्रीची झोप निवांत घेऊ शकतो. समाजात असेही काही पोलीस आहेत, जे त्यांच्या कर्तव्याचा भाग नसलेल्या गोष्टींमध्ये देखील मदतीला धावून येत असतात. माणुसकीचा झरा आपण जो म्हणतो तो अनेक कर्मचाऱ्यांच्या वागण्यातून मोठ्या प्रमाणावर दिसून येतो, याबद्दलच्या गोष्टी आपण अधूनमधून वाचतही असतो.
उत्तर प्रदेशात एका पोलिसाचे सुरू असलेले काम बघितले तर आपलाही या गोष्टीवरील विश्वास भक्कम होईल. अयोध्या येथील रणजित यादव हे पीएसआय म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या नेहमीच्या कामांमधून लोकांची मदत करत, त्यांचे प्रश्न सोडविण्यास मदत करत. हे काम करताकरता त्यांना एक गोष्ट दिसून आली. परिसरात अनेक लोक असे होते की त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती, काही तर भीक मागून दिवस काढत होते.
जिथे दोन वेळचे जेवण कठीण असते, तिथे मुलाबाळांच्या शिक्षणाचा विषयही येत नाही. या लोकांची लहान मुले बघून यादव यांना त्यांच्या भविष्याची चिंता भेडसावत असे. यादव फक्त हळहळ करून मोकळे झाले नाहीत, त्यांनी यावर सक्रिय काम सुरू केले आणि चक्क ते स्वतःच अशा गरीब घरांतील मुलांना शिकवू लागले.


