नेहमीसारखीच एक सकाळ. शाळेत सोडायला आलेली कुणाची आई प्रेमाने मुलाला झापतेय. आणि चौथीच्या वर्गात ढॅण्टॅढॅण म्हणत पोरासोरांनी सॉल्लीड धिंगाणा घातलाय. एकदम जिवंत, निरागस आणि तितकंच लोभसवाणं चित्र. सुखवस्तू घरातला अमन. हा खेळायला थांबला तर त्याच्या घरून त्याच्यासह सर्व मित्रांसाठी खाणं येतं आणि त्याच मुलांतला एक मुलगा स्टॅनली!
स्टॅनली वर्गातल्या मुलांहून थोडासा वेगळा आहे. नाचताना वर्गाचा हिरो आहे. आवडत्या टीचरसाठी तो कविता स्वत:हून पाठ करून म्हणतो, वर्गातल्या प्रोजेक्टसाठी दीपस्तंभाची छोटीशी प्रतिकृतीच उभारतो. तसा गोंडस आहे पण कधीमधी चेहरा मारामारी केल्यासारखा काळानिळा करून घेऊन, कधी सुजवून घेऊन येतो. म्हणे बाजारात कुण्या मुलीला वाचवताना त्याला हे इतकं लागलेलं असतं. तशी त्याला पुस्तकांची पानं फाडणारी लहान बहीण आहे, पटकन उडी मारून बस पकडणारी, धावत ट्रेन पकडणारी सुपरवुमन आई आहे, आणि बाबा आहेत. हे सगळं कधी दिसत नाही, पण त्याच्या निबंधांत, मित्रांबरोबरच्या गप्पांतून जाणवत राहातं. तसंही वर्गातल्या कुणाचंच घर किंवा घरचे सिनेमात नाहीत, त्यामुळे याच्या आईबाबांचं न दिसणं खटकत नाही.




