इतिहासाच्या उदरात नेमके काय दडले आहे याची कल्पना माणसाला तोपर्यंत येत नाही, जोपर्यंत पुरातत्त्व संशोधक हे जगासमोर आणत नाहीत. पुरातत्त्व संशोधक अनेक अज्ञात रहस्यं जगासमोर आणतात. नुकताच अशाच एका रहस्यावर प्रकाश टाकण्यात आला आणि पेरूमध्ये अस्तित्वात असलेल्या इन्का संस्कृतीतल्या एका धार्मिक प्रथेविषयीची मन हेलावून टाकणारी गोष्ट उघड झाली
पेरूमधील अँडीज पर्वतराजीत इन्का संस्कृती विकसित झाली.या संस्कृतीच्या आपल्या स्वतःच्या अशा प्रथा परंपरा होत्या. देवदेवतांना संतुष्ट करून घेण्यासाठी, निसर्गाचा प्रकोप होऊ नये म्हणून किंवा नैसर्गिक संकट येऊ नयेत म्हणून नरबळी देणं ही अशीच एक प्रथा.हा नरबळी देण्यासाठी मुख्यतः लहान मुलांचा वापर होत असे. कॅपाकोचा या नावाने त्यांच्यात प्रसिद्ध असलेला हा विधी समारंभपूर्वक केला जायचा. यामध्ये मुलांचा बळी देण्यासाठी चार पद्धती वापरल्या जायच्या. गळा दाबून मारणं, डोक्यावर एखाद्या अवजड हत्याराने प्रहार करणं, जिवंत पुरणं आणि श्वास कोंडणं.



