समाज जसा असेल तसा त्या भागातला सिनेमा बदलत जातो. माणसांचे विचार, त्यांचं राहणीमान आणि एकूण जीवन पद्धती हे नाट्यरूपात पडद्यावर उमटत जाते. समाजाला आरसा दाखवण्याचे एक प्रभावी मध्यम म्हणजे सिनेमा आणि त्यातही कमी वेळेत खूप काही सांगून जाणारं मध्यम म्हणजे लघुपट. याच तंत्राचा वापर नंदुरबारच्या आदिवासी भागातील ‘हरणखुरी’ गावच्या तरुणांनी केला आहे.
मोबाईल कॅमेरा, सोप्पे एडिटिंग तंत्र आणि साध्या-सरळ भाषेत मांडलेले सामाजिक प्रश्न. हरणखुरी गावातल्या ३० तरुणांनी मिळून ही कल्पना तयार केलीय. सुरुवातीला या तरुणांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून गावातील समस्या मांडायला सुरुवात केली होती, पण लोकांपर्यंत ते तेवढ्या प्रभावीपणे पोहोचत नव्हतं. म्हणून त्यांनी फिल्मच्या माध्यमातून याच समस्या पडद्यावर दाखवायला सुरुवात केली.
शौचालय, बाल मजुरी अशा विषयांवर लघुपट केल्यानंतर त्यांचा पुढील विषय ‘सिकल’ पेशींच्या आजरावर असणार आहे. या फिल्म्स ग्रामपंचायतीच्या सभेत प्रोजेक्टरवर लावल्या जातात. शिवाय युट्युबवर Aadiwasi JanJagruti या चॅनेलवर हे लघुपट अपलोड केलेले आहेत. अशा प्रकारे गावातला प्रत्येक माणसापर्यंत हा उपक्रम पोहोचत आहे.
आदिवासी भागातील तरुणांनी तंत्रज्ञानाची कास धरून सुरु केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे त्यांना भविष्यात यश मिळो हीच आशा करूयात !!
