तुम्ही ‘हिममानव’ विषयी ऐकलंय का ? बर्फाळ प्रदेशात रहणारा, माणसांसारखाच. पण पूर्णपणे माणूस नसून वानर आणि माणसाचं मिश्रण असलेला. अनेक दंतकथांमध्ये हा हिममानव दिसून येतो. असं म्हणतात की तिबेट, नेपाळ आणि हिमालयच्या बर्फाळ डोंगररांगांमध्ये हा हिममानव आजही राहतो. याला ‘यती’ म्हटलं जातं. फक्त हिमालयच नाही तर अमेरिकेतही हिममानव असल्याच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत.
हिममानव खरोखर आहे? की ही फक्त एक कल्पना आहे? काहीही असलं तरी ही गोष्ट ‘इंटरेस्टींग’ मात्र नक्कीच आहे. १९५६ साली ‘डॅनियाल टेलर’ या ११ वर्षाच्या मुलानं ‘दि स्टेट्समन’ नावाच्या दैनिकातील एक फोटो पाहिला. हे चित्र त्याचं आयुष्य बदलणार आहे हे त्याला त्यावेळी माहितही नव्हतं.
‘दि स्टेट्समन’ ची ही आवृत्ती कोलकातामधली होती. ज्या चित्राने त्याचं लक्ष वेधलं त्या चित्रात १३ इंच लांबीचा हिमामानवाच्या पायाचा ठसा दिसत होता. ब्रिटिश एक्सप्लोरर ‘एरिक शिप्टन’ यांना हा ठसा हिमालयात आढळला. हा फोटो आजही ‘यती’ या अज्ञात मानवाबद्दल एक सबळ पुरावा म्हणून मानला जातो.
यती – दि इकॉलॉजी ऑफ मिस्ट्री
डॅनियल टेलर या मुलाच्या मनातील उत्सुकतेचं रुपांतर आवडीत झालं आणि त्याने पुढे आपल्या आयुष्याची २७ वर्ष ‘यती’ च्या शोधकार्यात घालवली. या शोधकार्याचा लेखाजोखा म्हणजेच त्याचं नवीन पुस्तक “यती – दि इकॉलॉजी ऑफ मिस्ट्री.”
१९०४ मध्ये टेलर कुटुंब भारतात स्थायिक झालं. भारत नेपाळ सीमेलगत वैद्यकीय मिशनरी म्हणून त्यांच्या वडिलांनी काम केलं. त्यामुळे डॅनियल हे भारतातच लहानाचे मोठे झाले. यतीच्या शोध कार्यात सर्वात आधी त्यांच्या कुटुंबाने त्यांना मदत केली, पुढे नेपाळचा त्या वेळचा राजकुमार ‘बीर बिक्रम शाह देव’ बरोबर झालेल्या मैत्रीतून अनेक नव्या गोष्टी त्यांना समजल्या. त्याच बरोबर ‘इंदिरा गांधी’ यांच्याकडून त्यांना हेलीकॉप्टरची सुविधा मिळाली. या प्रवासात त्यांना हिंदी, नेपाळी, तिबेटीयन भाषा अवगत झाल्या. अशा तऱ्हेनं प्रकारे हिमालय आणि त्याच्या आसपासच्या बर्फाळ भागात ‘यती’ ची शोध मोहीम घेत असताना त्यांना यती नेमका कोण आहे याचा शोध लागला.
डॅनियल यांच्या मते यती हा खरं तर काळ्या रंगाचं अस्वल आहे, ज्याच्या पायाच्या ठशांना हिममानवाशी जोडलं गेलं. या अस्वलाचे पंजे हे आकाराने माणसाच्या पंज्यापेक्षा मोठे असतात. अर्थात ‘यती’ ही एक दंतकथा आहे.
आपल्या शोध मोहिमेबरोबर डॅनियल टेलर यांनी नेपाळ आणि तिबेट भागातील वनसंरक्षणासाठी काम केलं. ‘मकालू-बरून नॅशनल पार्क’ हे हिमालयातील वनक्षेत्र संरक्षित करण्यात टेलर यांची प्रमुख भूमिका होती. हिमालयातील हे पहिलं संरक्षित वनक्षेत्र आहे.
सध्या डॅनियल ७२ वर्षांचे आहेत आणि यतीच्या शोधात फिरलेल्या ठिकाणांना ते आजही भेट देतात. लहानपणी ज्या एका प्रेरणेने त्यांना या कामात ओढून घेतलं त्या यतीचा शोध अजूनही सुरूच आहे.
(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)
©बोभाटा





