सद्या सिनेमाक्षेत्रात बायोपिक्सची बरीच चलती आहे. एखाद्या व्यक्तीचं जीवन पडद्यावर बघायला लोकांनाही आवडताना दिसतंय. मराठीत प्रकाश बाबा आमटे, सिंधुताई संकपाळ यांचे जीवनपट यशस्वी झाले आहेत. आता महिलांच्या हक्कासाठी लढणार्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार होण्याचे संकेत आहेत.
याबाबत तृप्ती देसाईंनी स्वतः आपल्या फेसबुक पोस्टवर माहिती दिलीय. अभिनेत्री किशोरी शहाणे आणि दिग्दर्शक दिपक बलराज वीज यांनी तृप्ती देसाईंच्या कार्यालयात भेट देऊन या चित्रपटाची घोषणा केल्याचं देसाईंनी सांगितलं. तृप्ती देसाईंनी या भेटीचे फोटो शेअर करून आपल्या संघर्षाला महत्त्व दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत. पण अद्याप चित्रपटाची स्टारकास्ट मात्र समजलेली नाही.
नुकताच बिग बॉस मध्ये महिलेचा आवाज नसल्या कारणाने तृप्ती देसाईंनी या शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे! लहानशा खेड्यात वाढलेल्या तृप्ती ताईंनी समस्त महिला वर्गासाठी दिलेला लढा आणि त्यांना मिळालेलं यशापयश लवकरच आपण पडद्यावर पाहू शकतो. मंदिर प्रवेश सोडून आणखी कोणत्या विषयावर त्यानी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता का हेही या सिनेमातून आपल्याला समजेल.
