पाकव्याप्त जम्मू-काश्मिर भाग-२: तेथील लोकांची भाषा आपल्याला काय सांगतेय ऐका!

पाकव्याप्त जम्मू-काश्मिर भाग-२: तेथील लोकांची भाषा आपल्याला काय सांगतेय ऐका!

भाषा हा कोणत्याही प्रांतातील सामाजिक अभ्यासाचा महत्त्वाचा भाग असतो. इंग्रजही आपल्याकडे आले तेव्हा त्यांनी इंग्रजीचेही आक्रमण आपल्यावर केले. आणि जिथे जिथे इंग्रजांनी शहरे वसवली तिथे तिथे इंग्रजी बोलणार्‍यांची मोठी फौज त्यांनी उभी केली. तद्वत जम्मू काश्मिरकडे पाहिलं तर एक गमतीशीर चित्र दिसतं. 

भौगिलिकदृष्ट्या जम्मू काश्मिर एका मोक्याच्या आणि इंटरेस्टिंग जागी वसला आहे. इथे तिबेटी संस्कृती, भारतीय संकृती आणि पूर्व आशियायी संस्कृती (ज्याला इन्डो युरोपियनही म्हटले जाते) अश्या तीन्ही संस्कृतींचा अंतर्भाव इथे दिसतो. भाषेच्या दृष्टीनेही इथे तीन कुटुंबांतील भाषा बोलल्या जात असत. पूर्वेकडे लडाख वगैरे प्रांतात तिबेटी भाषा, अति उत्तरेकडे पठाणी, तुर्की भाषांचा प्रभाव असलेल्या भाषा आणि पश्चिम व दक्षिणेकडे वेगवेगळ्या काश्मिरी भाषांचा उपयोग होत असे.

काश्मिरचा काही भाग पाकिस्तानने व्यापल्यावर काय चित्र दिसतं ते बघा:

अजूनही भारताने व्यापलेल्या काश्मिर भागात प्रमुख बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर काश्मिरी!  अगदी जम्मू प्रांतात- जो पंजाबला खेटून आहे -डोगरी भाषा बोलणारे अजूनही बहुसंख्य आहेत. लडाखमध्येही तिबेटी भाषा बोलणार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

पण पाकव्याप्त काश्मिराकडे बघूया. पाकिस्तानला जवळ असणार्‍या गिलगिट प्रांतात मूळ भाषा वापरणार्‍यांचे प्रमाण ५० ते ९०% झाले आहे. (नक्की आकडा माहित नाही कारण अनेक वर्षे तिथे ही मोजदादच झालेली नाही). बाल्टिस्तान हा प्रांत मात्र अजूनही मूळ भाषा बोलतो आहे. (पाकिस्तानपासून तो तसा बराच दूरही आहे). मात्र इस्लामाबादच्या शेजारी असणार्‍या 'आझाद काश्मिर' म्हणवणार्‍या प्रांताचं बघा काय झालंय. तिथे मूळ भाषांचं पूर्ण उच्चाटन करण्यात आलंय. तिथे बहुतांश जनता आता पंजाबी बोलते! आता गंमत अशी की हा नकाशा आणि आकडे १९८१मधील आहेत. म्हणजे इतक्या वर्षात तिथे खरोखर काश्मिरी जनता शिल्ल्कही आहे का असा प्रश्न विचारला तर चूक ठरू नये!

पाकिस्तानातील सैन्य हे पाकिस्तानी-पंजाबी लोक कंट्रोल करतात हे लक्षात घेतलं तर पाकिस्तानी सैन्याचा किती जोर इथे आहे हे लक्षात येतेच. शिवाय त्या भागातील मूळ निवासी लोकांवर काय दर्जाचे आक्रमण चालले आहे याचाही अंदाज येतो. भाषा हे संस्कृतीवर हल्ला करण्याचे पहिले साधन आहे. 

भारतीय सैन्यही काश्मिरात आहे, तिथे आफ्स्पासारखे कायदे आहेत व त्याचा काही ठिकाणी काही सैनिकांकडून प्रसंगी त्याचा दुरुपयोगही होतो हे ही खरे असावे. पण भारतीय सैन्याने लोकांच्या रोजच्या आयुष्यात पाकव्याप्त काश्मिरसारखे आक्रमण केलेले दिसत नाही. काश्मिरी लोकांची संस्कृती, त्यांची भाषा यांच्यावर आक्रमण केलेले नाही हे ही लक्षात घेतले तर भारतीय सैन्याबद्दलचा आदर वाढतो हे नक्की!