भगवानदादाच्या जीवनावर आधारित “एक अलबेला” हा सिनेमा २४ जूनला प्रदर्शित झाला. यातील भगवानदादाची भूमिका मंगेश देसाई यांनी साकारली आहे तर गीता बाली यांच्या भूमिकेत आपल्याला विद्या बालन दिसून येणार आहे. भगवान पालव यांनी चित्रसृष्टीचा एक काळ गाजवला. आणि तसं म्हणायचं तर विद्या बालनसारखी अभिनेत्री मराठी चित्रपटात येणं हीदेखील एक मोठी गोष्ट आहे.
भगवानदादांच्या जीवनावर आधारित सिनेमा म्हणजे ओम प्रकाश, राजेंद्र कृष्ण, सी. रामचंद्र हे आलेच. या सिनेमात सी. रामचंद्र म्हणजेच रामचंद्र (अण्णासाहेब) चितळकर यांची भूमिका साकारली आहे अनेक नाटक आणि मालिकांमधून आपल्या समोर आलेले ‘विघ्नेश जोशी’ यांनी. हे सांगण्याचं विशेष कारण म्हणजे विघ्नेश जोशींना आपण एक नट म्हणून ओळखतो पण त्यांची खरी ओळख एक म्युझिशियन म्हणून आहे. विघ्नेश जोशी उत्तम हार्मोनियम वाजवतात. पंडित गोविंदराव पटवर्धन हे त्यांचे गुरु. मानवंदना, स्वरनिनाद, शब्द सुरांचे लेणे, दिवाळी पहाट असे विविध म्युझिकल कार्यक्रम विघ्नेश जोशी करत असतात. स्वतः संगीतकार असल्यामुळे सी. रामचंद्र साकारताना त्यांना अडचण आली नसावी असेच वाटते. गंमत म्हणजे चितळकरांनी कित्येक गाणी गायली पण ते संगीतकार म्हणूनच अधिक ओळखले जातात. अलबेला या मूळ सिनेमातली बहुतेक सर्व गाणी अण्णासाहेब चितळकरांनीच गायली होती. एकंदरीत विघ्नेश जोशींना यावेळी अगदी परफेक्ट रोल मिळाला आहे असं म्हणता यावं.
मंगेश देसाई, विद्या बालन, विघ्नेश जोशी या साऱ्या गुणी कलाकारांनी साकारलेला “एक अलबेला” हा सिनेमा एकदा तरी नक्कीच बघायला हवा.
