मुस्लिम राजांच्या कथांमध्ये येणारा हमखास उल्लेख म्हणजे जनानखाना. याला हरमही म्हणतात. काळ-धर्म-सामाजिक परिस्थिती यानुसार अशा काही प्रथा जगात आहेत. यांतल्या काही काळानुसार बंदही झाल्या. सांगोवांगीच्या कथा ते कुतूहल यातून हरमबद्दल बरंच काही चांगलं वाईट तुम्ही आजवर वाचलं असेल. म्हणूनच या विषयावर बोभाटा घेऊन आले आहे एक विस्तृत लेख. हे प्रकरण कसे सुरू झाले असेल, त्यात काय सोयीसुविधा असत, या स्त्रियांची कुचंबणा या सर्वांवर हा लेख प्रकाश टाकेल.
हरम म्हणजे स्त्रियांसाठी घरात राखून ठेवलेली जागा. त्याला जनानखाना देखील म्हणले जाई. हरम हा शब्द मूळ अरबी भाषेतील आहे. या शब्दाचा अर्थ होतो पवित्र किंवा वर्ज्य. हरम म्हणजे घरातील स्त्रियांसाठी राखून ठेवलेली जागा जिथे कुठल्याही पुरुषाला जाण्यासाठी परवानगी नसायची. मुघलांनी आपल्या हरममध्ये अनेक देशाच्या, अनेक धर्माच्या स्त्रिया ठेवल्या होत्या. या हरममध्ये मुघलांच्या बायका आणि त्यांच्या नातेवाईक स्त्रिया राहायच्या. यामधल्या बायका सहसा लग्न करून आलेल्या किंवा भेट म्हणून दिलेल्या असायच्या. काही मुलींचा जन्म देखील हरममध्येच झालेला असायचा व त्यांचे संपूर्ण आयुष्य हरममध्येच जायचे. हरममध्ये असणाऱ्या स्त्रियांना पडदा पद्धतीत राहण्याची सक्ती होती. त्यांना स्वतःच्या मर्जीने हरम बाहेर जायला परवानगी नव्हती. मुस्लीम समाजामध्ये स्त्रियांना कुठल्याही प्रकारच्या व्यवहारात दुय्यम स्थान असायचे. स्त्रिया स्वतःच्या रक्षणासाठी असमर्थ असतात त्यामुळे त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी पुरुषांवर असते असे मानले जायचे. मुस्लीम समाजात बहुपत्नीत्वाची प्रथा होती. त्यामुळे त्यातूनच जनानाखाण्याची प्रथा रूढ झाली असावी. हरम प्रामुख्याने मुसलमान समाजातील बादशहा, अमीर, उमराव, सुलतान अशा उच्च पदस्थ लोकांकडे असायचा. त्यांना बायकाही जास्त असायच्या व त्या सर्वांची राहण्याची सोय करणे त्यांना भाग होते. हरममध्ये स्त्रियांना पडदा पद्धतीमध्ये राहणे भाग होते. पडद्यात राहणे हे उच्च कुळाचे घरांदाजापणाचे लक्षण मानले जाई.





