शरीर सुदृढ राहावं म्हणून आपण सगळेच व्यायाम करतो. वजन वाढलं की वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतो. खेळाडू सतत सराव करत राहतात. अभिनेता किंवा अभिनेत्री चेहऱ्यावरचे तेज टिकवण्यासाठी व्यायामासकट वेगवेगळे उपाय करत राहतात. म्हातारी होत चाललेली माणसं तरुण दिसण्यासाठी धडपडत असतात. पण मेंदू तरुण राहावा, मेंदू तल्लख राहावा, विचार चपळ राहावेत यासाठी मेंदूचे व्यायाम कोणीच करत नाही.
मेंदू हा इतर अवयवांसारखाच आहे. वापरला तर धावतो, नाही वापरला की गंज चढतो. आठवा, मोबाईल हातात येण्यापूर्वीचे दिवस. कमीत कमी १०० ते २०० टेलिफोन नंबर सहज लक्षात राहायचे. आता जेमतेम २० ते २५ नंबर लक्षात राहतात.
आज आम्ही तुम्हाला मेंदू तल्लख, चपळ, तरतरीत आणि यंग फॉरेव्हर राहण्यासाठी काही व्यायाम सुचवतो आहे.







