गणपतीबाप्पाच्या पूजेतल्या पत्रीचं आयुर्वेदातलं महत्व, आपल्याला माहित असायलाच हवेत हे औषधी उपयोग..

लिस्टिकल
गणपतीबाप्पाच्या पूजेतल्या पत्रीचं आयुर्वेदातलं महत्व, आपल्याला माहित असायलाच हवेत हे  औषधी उपयोग..

गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन होऊन एव्हाना सगळीकडे त्यांची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. बाप्पाची पूजा करताना प्रत्येकाला पार्थिव गणेश पूजनातील वेगवेगळ्या पत्री अर्थात पानांची माहिती झालेली आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलाय की बाप्पाच्या पूजेमध्ये या पत्रींचं काय काम? त्यांचा बाप्पाशी नेमका संबंध काय? या आणि अशा प्रश्नांचं उत्तर देण्याचा हा प्रयत्न.

आता गणपती बाप्पाची आई पार्वती. पार्वतीचं आणखी  एक नाव आहे गिरिजा, म्हणजेच् डोंगरावर जन्म घेणारी. म्हणजेच ती एक नदीचंही रूप समजली जाते. नदीचा मळ म्हणजे तिचा गाळ. गाळाची माती अत्यंत सुपिक असते. या मातीचाच बनतो गणपती नि त्यातच उगवतात वनस्पती. म्हणूनच गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये त्यांचाच वापर होतो.

आता आपण या पूजेतल्या पत्रींची यादी त्यांच्या उपयोगांसह पाहू -

१. मालती - मोगऱ्याची पानं (Jasminum sambac)

१. मालती - मोगऱ्याची पानं (Jasminum sambac)

मोगऱ्याची फुलं आपल्या ओळखीची असतात. पण ही फुलं बारमाही नसतात . तेव्हा पानांवरूनच ही वनस्पती ओळखू आली पाहिजे नि हाच पूजासाहित्यांत पत्रींच्या उपयोगाचा हेतू आहे. मोगऱ्याची पानं जखमांवर वापरतात.  यांचा रस, पानं ठेचून केलेला ओला चोथा किंवा काढा जखमा धुण्यासाठी किंवा घाव भरून येण्यासाठी लेप म्हणून वापरतात.  वेगवेगळ्या त्वचारोगांसाठी ही पानं पोटातूनही घेतली जातात.

२. भृंगराज - माक्याची पानं (Eclipta alba)

२. भृंगराज - माक्याची पानं (Eclipta alba)

भृंगराज किंवा माका पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणथळ जागी उगवतो. माका केसांसाठी उत्तम मानला गेला असला तरी त्यामध्ये रसायनाचेही गुण आहेत. म्हणून केसाला लावायच्या तेलाशिवाय माक्याची पानं तुपात तळून विविध रोगांवर दिली जातात.
 

३. बिल्व - बेलाची पानं (Aegle marmalose)

३. बिल्व - बेलाची पानं (Aegle marmalose)

बेलाची पानं शंकराला प्रिय म्हणून आपल्याला ठाऊक असतात,  पण ती बाप्पालाही प्रिय आहेत. ही पानं शरीरावरील सूज आणि वेदना दूर करणारी आहेत. अतिघामाने शरीराला दुर्गन्धी येत असेल तर आंघोळीच्या गरम पाण्यात बेलपत्री घालून त्या पाण्याने अंघोळ करावी आणि ती पानं अंघोळीदरम्यान अंगास चोळावी म्हणजे अतिप्रमाणातील घाम आणि दुर्गन्धी कमी होतात.

४. श्वेत दूर्वा - पांढऱ्या दूर्वा (Cynodon dactylon)

४. श्वेत दूर्वा - पांढऱ्या दूर्वा (Cynodon dactylon)

पांढऱ्या दूर्वा म्हणजे अगदी पांढऱ्या रंगाच्या दूर्वा नसतात, पण बऱ्यापैकी फिकट रंगाच्या असतात. पावसाळ्याच्या शेवटाला दूर्वांच्या ताटव्यातून अचानक पांढऱ्या दूर्वा सापडतात. या गुणाने थंड असतात आणि दाह, आम्लपित्त, तृष्णा आणि तापावर पांढऱ्या दूर्वांचा रस,  पानं ठेचून केलेला ओला चोथा  आणि चूर्ण उपयुक्त होतात.

५. बदरी - बोरीची पानं (Ziziphus mauritiana)

५. बदरी - बोरीची पानं (Ziziphus mauritiana)

बोरीची पानं रुक्ष असतात. कफ, सर्दी, खोकला आणि त्वचा रोगांवर उपयोगी पडतात.

६. धत्तूर - धोत-याची पानं (Datura metel)

६. धत्तूर - धोत-याची पानं (Datura metel)

धोतरा ही विषारी वनस्पती आहे. त्याच्या बिया विषारी आहेत. त्यामुळं पानं सावधगिरीने वापरावी. दमा, खोकला आणि त्वचारोगांवर पानांचा  ठेचून केलेला ओला चोथा बाहेरून लेप म्हणून देतात. कमी प्रमाणात दमा, कास रोगांसाठी यांचा पोटातून औषध घेण्याचा प्रयोगही केला जातो.

७. तुलसी - तुळसीची पानं (Ocinum sanctum)

७. तुलसी - तुळसीची पानं (Ocinum sanctum)

तुळसीची पानं कृष्ण-विष्णुइतकीच गणपती बाप्पालाही प्रिय आहेत. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोग, ताप, अजीर्ण, अग्निमान्द्य अशा अनेक रोगांवर तुळशीची पानं खातात.

८. शमी - शमीची पानं (Prosopis cineraria)

८. शमी - शमीची पानं (Prosopis cineraria)

शमी वृक्ष आपल्याला महाभारत काळापासून ठाऊक आहे. शमीची काटेयुक्त पानं कफविकारांवर आणि त्वचारोगांवर,  पानं ठेचून केलेला ओला चोथाकिंवा चूर्ण स्वरूपात लेप करतात किंवा मधाबरोबर खाल्ली जातात.

९. अपामार्ग - आघाड्याची पानं (Achyranthes aspera)

९. अपामार्ग - आघाड्याची पानं (Achyranthes aspera)

अपामार्ग म्हणजे आघाडा. ही वनस्पतीही पावसाळ्यात जागोजागी उगवते. ती ज्वर, कफविकार, उदररोगांवर उपयुक्त आहे. आघाड्याच्या पांढऱ्या तुऱ्यांतील तांदूळ म्हणजे बियांपासून केलेली खीर खाल्ल्यास अनेक दिवस भूकेची भावनाच होत नाही असं सांगतात.

१०. बृहती - डोरलीची पानं (Solanum indicum)

१०. बृहती - डोरलीची पानं (Solanum indicum)

बहुतांशी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर जमिनीवर पसरणारी ही वेल असते. हिची सारखी दिसणारी पण लहान पानाफुलांची कण्टकारी नावाची बहिणही आहे. डोरलीची पानं उदरविकार, अस्थि-सन्धिचे रोग, कफविकारांवर उपयुक्त आहेत. डोरलीच्या फळांचा डोक्यावर मधातून लेप केल्यास टक्कलावर केस उगवतात असे सांगतात.

११. करवीर - कण्हेरीची पानं (Nerium indicum)

११. करवीर - कण्हेरीची पानं (Nerium indicum)

करवीर किंवा कण्हेर हादेखिल एक विषारी वृक्ष मानला आहे. याचे तांबडा आणि पिवळा असे फुलांच्या रंगांवरून दोन प्रकार आहेत. याची पानं खाल्यानं घोड्यांचा मृत्यू होतो असा समज असल्याने याला हयमार किंवा अश्वमार असेही नाव आहे. अौषधांमध्ये प्रामुख्याने उपयोग करताना प्रमाणाकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. तरी याचा वापर दमा, हृद्रोग, सूज, रक्तविकार, ज्वर, त्वचारोगांमध्ये केला जातो. व्रणावर लेपही करतात.

१२. अर्क - रुईची पानं (Calotropis procera)

१२. अर्क - रुईची पानं (Calotropis procera)

रुई दोन प्रकारची असते. हिच्या पांढरी फुलं असणा-या प्रकाराला मांदार म्हणतात. रुईचा चीक विषारी गुणधर्म दर्शवतो. गुणाने उष्ण असलेली रुईची पानं आमवात, संधिवात, त्वचारोगांवर वापरतात. पानांचा लेप दमा, सर्दी, खोकला आणि ज्वरावरही करतात. रुईचा वापरही काळजीपूर्वक करावा लागतो.

१३. अर्जुन - अर्जुनाची पानं (Terminalia arjuna)

१३. अर्जुन - अर्जुनाची पानं (Terminalia arjuna)

अर्जुन हा बारमाही वृक्ष असला तरी अत्यंत उपयुक्त अौषधी आहे. याचं पांढ-या रंगाचं खोड ही ओळखण्याची खूण, यावरूनच याचं नाव अर्जुन म्हणजे गोरा, पडलेलं आहे. शिवाय याच्या पानांच्या देठाशी असलेल्या दोन छोट्याशा ग्रंथीही याची ओळखण्याची महत्त्वाची खूण आहे. याची साल हृदयाला बळ देते. शिवाय अर्जुनसाल हाडं आणि दातांनाही बळकटी देते. त्वचारोग, रक्तविकार, मधुमेह आणि ज्वरावरही अर्जुन उपयुक्त आहे.

१४. विष्णुक्रान्ता - गोकर्णाची पानं (Clitoria ternatea)

१४. विष्णुक्रान्ता - गोकर्णाची पानं (Clitoria ternatea)

हिची वेल असते आणि फुलांच्या रंगावरून निळी आणि पांढरी अशा दोन जाती सांगतात. गोकर्णाची पानं कानाभोवतालच्या सूजेवर देतात. शिवाय कफविकार आणि रक्तविकारांवरही गोकर्ण पान उपयुक्त आहे.

१५. दाडिम - डाळींबाची पानं (Punica granatum)

१५. दाडिम - डाळींबाची पानं (Punica granatum)

डाळींबाचे अनेक उपयोग आहेत. फळातील रस रक्तवर्धक आणि बलदायक आहेच पण ताप, दाह, अतिसार, अम्लपित्त, तृष्णाविकारांवर आणि पाचक म्हणूनही उपयुक्त आहे. फळाची साल त्वचारोगांवर आणि कृमींवर उपयोगी आहे. फुलंही रक्तदोषांवर वापरली जातात.

१६. देवदारु - देवदारुची पानं (Cedrus deodara)

१६. देवदारु - देवदारुची पानं (Cedrus deodara)

देवदार हा हिमालयातील वृक्ष मानला जातो. हा वातविकार, आमवात, सन्धिवातावर लेप किंवा पोटात घेऊन वेदना कमी करण्यासाठी वापरतात. तो रक्तदोषहर असून कृमी, व्रण आणि मधुमेहावरही उपयुक्त होतो.

१७. मरु - मरव्याची पानं (Mojorana hortensis)

१७. मरु - मरव्याची पानं (Mojorana hortensis)

मरवा पावसाळ्यात उगवणारी सुगंधी वनस्पती आहे. ही रस-रक्त धातूंवर काम करणारी वनस्पती असून प्रामुख्याने त्वचारोगांवर बाह्यउपचारात वापरतात.

१८. अश्वत्थ - पिंपळाची पानं (Ficus religiosa)

१८. अश्वत्थ - पिंपळाची पानं (Ficus religiosa)

पिंपळाचा वृक्ष आपल्याकडे पवित्र वृक्ष म्हणून मानतात. याच्या पानांचा उपयोग दमा, खोकला अशा कफविकारांवर केला जातो. मुळांचा वापर अस्थि, सन्धि आणि उदरविकारांवर करतात.

१९. जाती - जाईची पानं (Jasminum officinale)

१९. जाती - जाईची पानं (Jasminum officinale)

जाती किंवा जाई आपल्याला तिच्या सुगंधी फुलांमुळे माहिती असते. हिची फुलं हृदयाला बल देतात. हिची पानं व्रणशोधक आणि व्रणरोपक आहेत. मुखरोगांमध्ये जाईची पानं खाल्ली जातात. यामुळे दन्तरोग दूर होतात आणि दात दृढ होतात. त्वचारोग आणि खाजेसाठीही पानांचा रस, कल्क किंवा चूर्णाचा वापर होतो.

२०. केतकी - केवड्याची पानं (Pandanus odorotissimus)

२०. केतकी - केवड्याची पानं (Pandanus odorotissimus)

केवडाही आपल्याला त्याच्या सुगंधिपणाने माहितीचा आहे. याचा वापर विविध रोगांवर केला जातो. याच्या फुलांतील परागांचं नस्य अपस्मारात (मिरगी) देतात. कर्णशूलात ते कानात फुंकतात. याने जखमाही भरून येतात. शरीरदुर्गन्धी नाशक म्हणून उपयुक्त आहेत. केवड्याचा सुगंध मानसिक दोषांच्या शांतीसाठी उपयुक्त मानतात. केवड्याचे मूळ मधुमेहात उपयुक्त आहे.

२१. अगस्ति - अगस्तिची पानं (Sesbania grandiflora)

२१. अगस्ति - अगस्तिची पानं (Sesbania grandiflora)

अगस्तिचा वृक्ष भारतभरात बघायला मिळतो. याच्या पानाचा रस मानसरोगामध्ये नस्यद्वारे वापरतात. यामुळे बेशुद्धी दूर होते. मस्तिष्क दौर्बल्य दूर करण्यासाठी आणि डोळ्यांची शक्ती वाढवण्यासाठी अगस्त्याच्या पाना-फुलांचा वापर करतात. त्वचारोगांवर पानांचा लेप करतात. शिरःशूल, प्रतिश्याय, कफज्वरात पानांच्या रसाचं नस्य देतात. पाना-फुलांची भाजी भूक न लागणे, कृमी अशा उदरविकारामध्ये देतात.

 

ही पानं पूजेसाठी प्रत्येकाने गोळा करणं अपेक्षित आहे. निसर्गात आढळणाऱ्या या वनस्पतींपैकी काही बारमाही उपलब्ध असल्या तरी काही खास पावसाळ्यातच उगवतात आणि गणेश पूजनाच्या वेळीच मिळतात. या सगळ्याच वनौषधी आहेत आणि गणेश पूजनाच्या अनुषंगाने त्यांची ओळख करून घेण्याची संधी आपल्याला मिळते. या माहितीच्या आधारे आपण त्यांचा अौषधी उपयोगही गरजेप्रमाणे करू शकतो, यात कसलाही संशय नाही.