मंडळी, आज आपण एका दुर्लक्षित परंतु महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. महिलांच्या स्तन कर्करोगाविषयी जनजागृती होत आहे, काही अंशी ती सफलही झाली आहे. पण पुरुषांचं काय? पुरुषांनाही स्तनांचा कर्करोग होतो का? याचे उत्तर आहे… होतो! पुरुषांनाही स्तनांचा कर्करोग होतो. चला तर मग पाहूया काय आहे हा पुरुषांचा ‘ब्रेस्ट कॅन्सर’, आणि तो होण्याची कारणे व उपाय…
मुळात आपल्याकडे एक गैरसमज आहे की पुरुषांना स्तन नसतात म्हणून त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. पण असं नाही मंडळी. 400 पुरुषांमधून एकाला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. महिला आणि पुरुष दोघांनाही ब्रेस्ट टिश्यूज असतात. महिलांमध्ये अनेक प्रकारच्या हार्मोन्सच्या प्रभावामुळे त्यांच्या स्तनांना आकार मिळून ते मोठे होतात मात्र पुरुषांमध्ये हे हार्मोन नसल्याने पुरुषांचे स्तन अविकसित राहतात आणि छाती सपाट राहते.












