कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचं महत्त्व नव्याने अधोरेखित झालं. श्वास घेणं ही प्रक्रिया इतकी सहज घडते की श्वसन आणि त्यासाठी लागणारा ऑक्सिजन या दोघांनाही आपण बऱ्यापैकी गृहीत धरतो. त्याचं महत्त्व काय हे श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हाच लक्षात येतं. पाण्यामध्ये बुडून किंवा धुरामुळे गुदमरून पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने माणसाचा जीव गेल्याची उदाहरणं आहेत. शिवाय अचानक हृदयविकाराचा झटका येतो त्यावेळीही अशीच आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. यावेळी सीपीआर हा साधासोपा उपाय केला असता जीव वाचण्याची जवळपास ५० टक्के शक्यता असते. बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक केके यांचा कोलकाता मध्ये झालेल्या एका लाईव्ह कॉन्सर्टनंतर कार्डिॲक अरेस्टमुळे मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार त्यांच्या हृदयाला जोडलेल्या रक्तवाहिनीमध्ये ८० टक्के ब्लॉकेजेस होते. मात्र त्यावेळी त्यांना वेळेत सीपीआर मिळाला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते.
ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्यास मेंदूला साधारण चार ते सहा मिनिटांनी धोका निर्माण व्हायला सुरुवात होते आणि केवळ आठ मिनिटांत मृत्यू येऊ शकतो.
सीपीआरचा उपयोग अनेक प्रसंगी होतो -
१. विजेच्या उपकरणामुळे शॉक लागल्यास
२. गिळताना अन्नाचा कोण किंवा औषधाच्या गोळ्या अडकल्याने श्वास गुदमरल्यास
३. विषबाधा, अतिरक्तस्राव, डोक्याला मार लागणं इत्यादी






