तुम्हाला कोव्हिड होऊन गेला आहे का? त्यातून सहीसलामत बचावलो म्हणून तुम्ही देवाचे आभार मानत स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे का? तसं असेल तर थांबा. एक मोठ्ठा श्वास घ्या, कारण त्याने शरीरात खोलवर काय गडबड करून ठेवली आहे हे तुम्हाला माहितीच नाहीये.
कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि नंतर फार काही त्रास न होता लक्षणं सौम्य झाली की आपल्याला सुटल्यासारखं वाटतं. 'चला एकदाचा होऊन गेला... आता काही भीती नाही' असं म्हणून या न्यायाने माणसं शूर होतात. पण म्हणून आपण खरोखर वाचलोय का? की या विषाणूने शरीरात अजून काही गडबड करून ठेवलीय? आणि तसं काही असेल तर ते कसं कळणार?






