ऑस्ट्रेलियाच्या त्या डॉक्टरसाठी गेल्या अनेक वर्षांपासून एक कोडं सुटलं नव्हतं. ते म्हणजे अल्सरचे गंभीर अवस्थेतले पेशंट्स. इतके गंभीर, की काहींचं आतड्याचं थेट ऑपरेशनच करावं लागायचं तर काहींना मरेस्तोवर रक्तस्त्राव व्हायचा. त्या डॉक्टरचं नाव होतं बॅरी मार्शल. तो साधा इंटर्नशिप करणारा डॉक्टर होता. आता अल्सर हे काही फार गंभीर दुखणं समजलं जात नाही, त्याच्यावर सहजसोपे उपचार आहेत.पण त्या काळी तसं नव्हतं.
१९८१ मध्ये मार्शलने रॉबिन वॉरेन नावाच्या पॅथॉलॉजिस्टसोबत काम करायला सुरुवात केली.सर्पिलाकार आणि मजबूत असे हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचे जिवाणू आतड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वस्ती करून असतात असं या रॉबिनने शोधून काढलं होतं. अल्सरच्या रुग्णांची बायोप्सी करून आणि प्रयोगशाळेत त्यातील सूक्ष्मजीवांचं कल्चर तयार करून मार्शलने फक्त अल्सरच नाही तर आतड्याच्या इन्फेक्शनसह पोटाच्या कर्करोगा साठीही हे जिवाणू जबाबदार असल्याचा शोध लावला. त्याच्या लक्षात आलं, की प्रतिजैविकं हा यासाठी सहजरीत्या उपलब्ध होऊ शकणारा उपचार आहे. पण बाकीची तज्ञ मंडळी मात्र जुन्या गोष्टींना सोडण्यास तयार नव्हती कारण त्यांच्या मते अल्सर हा तणावामुळे उद्भवणारा आजार होता.




