केसातल्या कोंड्याचा त्रास सगळ्यांना का होत नाही असा प्रश्न पडलाय? उत्तर इथं आहे!!

लिस्टिकल
केसातल्या कोंड्याचा त्रास सगळ्यांना का होत नाही असा प्रश्न पडलाय? उत्तर इथं आहे!!

"आज ये कुर्ता चलेगा ना? ये जूते चलेंगे ना?" या प्रश्नांना उत्तर देताना "ओ डूड! डँड्रफ नही चलेगा" हे सांगणाऱ्या रणवीरची शाम्पूची जाहिरात आठवते? एव्हाना लक्षात आलंच असेल आजचा लेख कशाबद्दल आहे ते. बरोबर, आजचा विषय आहे आपल्यापैकी अनेकांसाठी चिंतेचा विषय असलेला, चारचौघात गेल्यावर लाज आणणारा, आणि नकोनकोसा वाटणारा डँड्रफ, अर्थात डोक्यातला कोंडा.

आता हा कोंडा म्हणजे काय?

आता हा कोंडा म्हणजे काय?

कोंडा म्हणजे डोक्यावरील केसांमध्ये आढळणारे खपल्यांसारखे दिसणारे पांढऱ्या रंगाचे त्वचेचे सूक्ष्मकण. ते अनेकदा मान, खांदा ह्या ठिकाणीही दिसतात. कोंडा खूप हानिकारक नसला तरी त्यामुळे खाज सुटते. त्यामुळे त्या व्यक्तीला बाहेर, समाजात वावरताना अनेकदा कान'कोंडं' वाटू शकतं.

कोंडा होण्याची कारणं

कोंडा होण्याची कारणं

सामान्यतः कोंडा होण्यास मालासेझिया नावाची यीस्टसारखी बुरशी कारणीभूत असते. ही बुरशी कोणत्याही कारणाशिवाय निरोगी लोकांच्या डोक्याच्या त्वचेवर आढळते.
- स्ट्रेस असणाऱ्या व्यक्ती, आजारी व्यक्तींंना कोंड्याचा त्रास जास्त होतो असं काही तज्ञ म्हणतात.
- थंड हवा, डोक्यावरची कोरडी त्वचा हेदेखील कोंड्यासाठी कारणीभूत ठरतात.
- कोंडा होण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे सिबोऱ्हीक डर्मेटायटिस (seborrheic dermatitis) हा विकार. ह्या विकारात डोक्याची त्वचा लाल होते, त्यावर खवल्यांसारखे चट्टे (scaly patches) उमटतात.

- केस अतिरिक्त प्रमाणात तेलकट किंवा कोरडे असतील किंवा हेअर प्रॉडक्ट्सप्रती संवेदनशील असतील, तरी कोंड्याची समस्या उद्भवते.

असं असलं तरी काहीजणांना कोंडा होत नाही. हे कशामुळे?

असं असलं तरी काहीजणांना कोंडा होत नाही. हे कशामुळे?

यामागे अनेक कारणं आहेत.
- तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींमध्ये कोंडा जास्त प्रमाणात होतो. वृद्ध लोकांमध्ये हे प्रमाण कमी असतं.
- पुरुषांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असतं.
- पार्कीन्सन्स, क्वचित प्रसंगी एचआयव्ही यांसारखे विकार असणाऱ्या लोकांना ही समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.
- केस मुळात तेलकट असतील तर कोंडा जास्त असतो. कोरडे केस असलेल्यांनीही वारंवार शॅम्पू केल्यास कोंड्याचा त्रास होतो.

कोंडा कमी करण्यासाठी उपाय

कोंडा कमी करण्यासाठी उपाय

कोंडा कमी करण्यासाठी अँटिडँड्रफ शाम्पू वापरतात. याशिवाय कोरफड, लिंबाचा रस, बेकींग सोडा, ऍस्पिरिन आणि शाम्पू यांचं मिश्रण या घरगुती उपायांनीदेखील कोंड्याचं प्रमाण कमी होतं.

स्मिता जोगळेकर