देश-परदेशात फिरताना आपल्याला तिथली महत्वाची प्रेक्षणीय स्थळे पहायची असतातच, तसेच तिथली संस्कृतीही जाणून घ्यायची असते. वेगवेगळ्या देशांत सार्वजनिक ठिकाणी अशा अनेक सोयीसुविधा आपण पाहत असतो ज्या पाहिल्यावर असे वाटते असं आपल्या देशातही हवंय. आज अशाच वेगवेगळ्या देशांतल्या सुविधांची यादी पाहून घेऊयात, ज्या आपल्या देशातही राबवता येतील.
विदेशातील या सोयीसुविधा आपणही आपल्या देशात आणायला हव्यात ! ही यादी वाचून सांगा कोणत्या ताबडतोब अंमलात आणता येतील !


१.अमेरिका
अमेरिकेत सायकलस्वारांसाठीही रस्त्यांवर ट्राफिक सिग्नल आहेत. आपल्याकडे जसे पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रस्त्यांवर गाड्यांसाठी ट्राफिक सिग्नल आहेत. तसे सायकलवाल्यांनाही सुरक्षितपणे सायकल चालवू शकतील यासाठी ही सोय केली आहे. सध्या पुण्यात सायकलस्वारांसाठी वेगळे सायकल ट्रॅक्स असले तरी देशातल्या इतर शहरांत ही सुविधा आहेच, असे नाही.

२.फिनलंड
फिनलंड मधील लोक खूप नम्र आणि सर्वांचा आदर करणारे आहेत. सार्वजनिक बसने प्रवास करतानाही हे लोक ड्रायव्हरचे आभार मानतात. इथल्या प्रत्येक बसमध्ये एक खास बटण बसवलेले आहे, हे बटण दाबल्यावर ड्रायव्हरचे आभार मानले जातात. ड्रायव्हरला अश्या छोट्याशा कृतीमुळे खूप प्रोत्साहन मिळते. सुरक्षित प्रवास झाल्यावर प्रत्येक प्रवासी न चुकता हे बटण दाबतो.

३.ऑस्ट्रेलिया –
आजकाल फोन पूर्ण चार्ज झाल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू शकत नाही. पण कधी फोन चार्ज करायचा राहिल्यास काय करायचे? ऑस्ट्रेलियात त्यासाठी सार्वजनिक सायकलस्वारांना फोन चार्ज करायची सुविधा दिली आहे.जितके पेडलिंग कराल तितक्या लवकर फोन चार्ज होतो. यामुळे एखाद्या ठिकाणी पोहोचताही येते आणि फोनही चार्ज होतो.

४.स्वित्झर्लंड –
मोठमोठ्या मॉल किंवा ऑफिसमध्ये पार्किंग अगदी तळमजल्यावर दिले असतात. तिथे लिफ्टची सोय असते, पण अशी ठिकाणं बरेचदा अगदी निर्मनुष्य असतात आणि कधीकधी तिथे अंधारही असतो. म्हणून स्वित्झर्लंडमध्ये पार्किंग लॉटमधून स्त्रियांना लवकर बाहेर पडता येईल अशा ठिकाणी गाडी पार्क करण्यासाठी जागा आरक्षित केलेली असते. या राखीव ठिकाणी फक्त महिला गाडी पार्क करतात जिथून बाहेर पडणे अगदी सोपे जाईल.

५. युके
युकेतले खास लाल टेलिफोन बूथ सगळ्यांना आकर्षित करतात. मोबाईल फोन आल्यापासून या सार्वजनिक टेलिफोन बूथचा उपयोग काय करायचा यासाठी भन्नाट आयडिया लढवली गेली. या लाल बुथचा डेफिब्रिलेटर्समध्ये रूपांतर केले गेले. या ठिकाणी आता हृदयविकाराचा झटका आल्यास छातीवर विजेचा शॉक देता येतो. त्यामुळे हार्टअटॅकने जाणारे जीव वाचू शकतील. आपत्कालीन वेळेत रुग्णाला रुग्णालयात नेण्याआधी ही सोय नक्कीच चांगली आहे

६. स्वीडन –
कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी स्वीडनमध्ये कचरापेटीला वायफाय सेवा दिली आहे. यामुळे तुमच्याकडचा कचरा टाकण्यासाठी तुम्ही कचरापेटी शोधत असाल, तर ती सहज शोधता येते. त्यामुळे कचऱ्याचा ढीग न साठता कचरा पेटीत जाऊन स्वच्छता राखली जाते.

७. जर्मनी
रात्रीच्या अंधारात दरवाजाच्या लॉकमध्ये बरोबर चावी घालून दरवाजा उघडणे म्हणजे एक दिव्यच असते. चावी कुठे घालावी हे पटकन कळत नाही, म्हणून जर्मनीमध्ये दरवाज्यावर असे डिजाईन केले आहे की ज्यामुळे न बघताही लॉक सहज उघडता येईल. हे असे दरवाजे उघडणे खरंच किती सोपे जाईल ना?

८. जपान
ट्रॉलीमध्ये जड सामान नेणे आता काही नवीन राहिले नाही. मॉलमध्ये खरेदी करताना तर आपण या ट्रॉलीज सहज ढकलत ने-आण करतो. परंतु जिने आल्यास आपल्याला या ट्रॉलीज नेता येत नाहीत. यासाठी जपानमध्ये ट्रॉलीजखाली खास टॅंक पॅलेट बसवले जाते, ज्यामुळे जड सामान जिन्यावरून ने-आण करणे सोपे जाईल.

९. इटली
इटलीमध्ये अरुंद गल्यांमध्ये कुठलेही सामान न्यायचे असल्यास एका कंपनीने खास सायकल बनवल्या आहेत. ज्यामुळे डिलीव्हरी अगदी घरापर्यंत होऊ शकते. मोठमोठ्या गाड्या या छोट्या गल्लीबोळातून सामान पोहचवू शकत नाहीत, त्यामुळे ही भन्नाट आयडिया ग्राहकांना खुश करण्यासाठी मस्तच आहे.

१०. कॅनडा
एखादेवेळी आपली सायकल किंवा दुचाकी बिघडते आणि जवळपास गॅरेज नसेल तर किती पंचाईत होते. म्हणूनच कॅनडामध्ये प्रत्येक बागेत एक मोफत बाईक रिपेअर स्टँड बसवण्यात आले आहे. यामध्ये हवा भरणारा पंप, स्क्रुड्रायव्हर, पाना, पक्कड असे साहित्य उपलब्ध असते. जेणेकरून गाडीची पटकन दुरुस्ती होऊन पुढचा प्रवास करता येईल.
यातली कुठली सुविधा आपल्याकडे पहिल्यांदा राबवायला हवी असे वाटते?
शीतल दरंदळे