१. ग्लेनमार्क फार्मा आपल्यासाठी नवी कंपनी नाही. ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस ही ग्लेनमार्क फार्मा या औषध उत्पादन करणार्या कंपनीची आतापर्यंत उपकंपनी होती. म्हणजे पालक-बालक असा हा प्रकार आहे. आता आयपीओनंतर फार्मा आणि सायन्सेस या दोन कंपन्या वेगवेगळ्या होऊन काम करतील आणि त्यांचे शेअरबाजारातील लिस्टींग वेगवेगळे असेल. आर्थिक जगतात याला 'स्पीन-ऑफ' असे म्हणतात. १९७७ साली स्थापन झालेल्या ग्लेनमार्कने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले ते त्यांच्या एकाच उत्पादनाने, 'कँडीड' या मलमामुळे! तुमच्या घरातील औषधाचा कप्पा चेक करा, या मलमाची ट्यूब सापडेलच सापडेल!
त्यामुळे बरीच वर्षे ग्लेनमार्कची बाजारातील ओळख ' डर्मॅटॉलॉजी' म्हणजे स्कीन स्पेशालीस्ट अशीच होती. आजही जगाच्या कानाकोपर्यात ग्लेनमार्कची ही उत्पादने प्रसिध्द आहेत. थोडक्यात, कंपनी चांगल्या जातकुळीतील आहे.
पण आज आपण नव्या आयपीओबद्दल बोलणार आहोत, त्यामुळे जुन्या पालक ग्लेनमार्क फार्माबद्दल जास्त न बोलता या पालक आणि बालक या दोन कंपन्यांत काय फरक आहे ते समजून घेऊया.
२. औषधी कंपन्या दोन प्रकारच्या असतात. काही कंपन्यांना 'फॉर्म्युलेशन कंपनी म्हणून ओळखले जाते. या कंपन्या औषधाचा मूळ कच्चा माल विकत घेऊन त्यांचे 'डोसेस' बनवतात. तर दुसरा प्रकार म्हणजे काही कंपन्या 'एपीआय' कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. एपीआय म्हणजे Active Pharmaceutical Ingredient. काही कंपन्या फॉर्म्युलेशन आणि एपीआय दोन्ही बनवतात. ग्लेनमार्क फार्मा फॉर्म्युलेशन आणि एपीआय दोन्हींचे उत्पादन करते, पण या आयपीओनंतर एपीआयचे काम ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस करणार आहे.
या क्षेत्राची फारशी माहिती नसलेल्या गुंतवणूकदारांना एक उदाहरण देऊन हा फरक समजावून सांगण्याचा एक प्रयत्न करूया!
ताप आला की आपण क्रोसीन घेतो. या क्रोसीनच्या गोळीचा एपीआय म्हणजे पॅरासिटेमॉल. हे पॅरासिटेमॉल विकत घेऊन त्यांच्या गोळ्या बनवणे म्हणजे 'फॉर्म्युलेशन'. सोप्या शब्दात सांगायचे तर बुंदी म्हणजे एपीआय आणि वळलेला लाडू म्हणजे फॉर्म्युलेशन!!