भरपेट जेवणानंतर एक ग्लास कोकम सरबत हवंच. शास्त्र असतं ते! कोकम हा भारतीय, त्यातही महाराष्ट्रीय आहारातील एक अतिशय महत्वाचा पदार्थ. मांसाहारी आणि शाकाहारी अशा दोन्ही पदार्थांसोबत जुळवून घेणारा कोकम तितकाच बहुगुणी आहे. आज आपण या कोकमाचे फायदे जाणून घेणार आहोत.
अँटीऑक्सिडंट गुणांनी भरपूर असलेले कोकम हे उन्हाळ्यातील एक वरदानच आहे. आयुर्वेदात वृक्षमाला म्हणून ओळखला जाणारा कोकम आधुनिक वैद्यकीय भाषेत गार्सिनिया इंडिका म्हणून ओळखला जातो. भारताच्या पश्चिम घाटात आणि अंदमान नोकोबार बेटावर कोकम भरपूर प्रमाणात आढळतो. कोकमाच्या झाडाला लाल रंगाची फळे लागतात. त्यांना रातांबा असं म्हणतात. या रातांब्यावरची सालं उन्हात सुकवली जातात आणि या सुकलेल्या कोकमाचा निरनिराळ्या पदार्थात वापर केला जातो. चवीला आंबट असले तरी कोकमामुळे भाजी, आमटीला मस्त चव येते.







