आईने बाळाची हत्या केली ही बातमी आहे पण हत्येचे कारण आपल्याला सामाजिक लांछन आहे !

लिस्टिकल
आईने बाळाची हत्या केली ही बातमी आहे पण हत्येचे कारण आपल्याला सामाजिक लांछन आहे !

आता सगळं काही  छान चाललं आहे,लवकरच एका मोठ्या संकटातून आपण बाहेर पडणार आहोत असं ज्या दिवशी वाटत असतं त्याच दिवशी अशी काही बातमी वाचण्यात येते की मनाची उभारी एका क्षणात कोलमडून पडते.त्या बातमीने पुन्हा एकदा आपण निराशेच्या आणि असहायतेच्या गर्तेत ढकलले जातो.दुर्दैवाची व्यथा अशी आहे की अशाच नकारात्मक बातम्या 'व्हायरल' होतात.एखाद्या घटनेचे 'बातमी मूल्य' वाढत जाते पण या बातम्या आपल्या सोशल रिग्रेशन म्हणजे सामाजिक प्रतिगामित्व वाढत जाण्याच्या खूणा आहेत याची कोणीही दखल घेत नाही.आता जी 'क्राइम स्टोरी'  तुम्ही वाचणार आहात ती निव्वळ निर्घृण गुन्ह्याची कथा म्हणून न वाचता वेगळ्या विचाराने वाचा आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा.पण त्याआधी ही बातमी पूर्ण वाचा ! 
 

आज अशी घटना तुमच्यासमोर आणत आहोत ज्यामध्ये एका आईने  आपल्या अवघ्या ३ महिन्याच्या बाळाचा बळी घेतला आणि ते लपवण्यासाठी चक्क बतावणी उभी केली. पण तिने असे का केले याचे  कारण वाचलेत तर  धक्का बसेल. ही पूर्ण घटना  दिसते तितकी सरळ नाहीच .मुंबईच्या क्राईम ब्रांचने ती नेहेमीप्रमाणे मोठ्या शिताफीने उलगडली.  

मुंबईच्या काळाचौकी परिसरात राहणारी सपना मगदूम नावाची ३२ वर्षीय महिला मंगळवारी पोलीस चौकीत आली.अतिशय भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या सपनाने सांगितले की तिच्या ३ महिन्याच्या मुलीचे अपहरण झाले आहे. पुढे  ती म्हणाली
" मी दुपारी मुलीसोबत होते तेव्हा एक विक्रेता दारात आला तो जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी देत होता.मी जूने कपडे आणायला आतल्या खोलीत गेले आणि अचानक तो पाठीमागून आला त्याने मला पकडून माझे तोंड रुमालाने दाबले. त्या  रुमालाला क्लोरोफार्म  लावले होते, त्यामुळे मी बेशुद्ध पडले आणि त्याने मुलीला पळवून नेले. " 

पोलिसांनी सपनाने सांगितल्याप्रमाणे अपहरणाची तक्रार लिहून घेतली. त्यानंतर चौकशी सुरु केली. तिचा नवराही तिच्यासोबत आला होता. त्याची चौकशी झाली. पोलिसांनी त्या विक्रेत्याचा शोधही सुरू केला.दुपारी ती राहते त्या भागात कोण कोण येऊन गेले याचा कसून शोध सुरू झाला. 

सपनाचीही परत चौकशी झाली, तेव्हा त्यांना तिच्या बोलण्यात काहीतरी गडबड आहे असं जाणवलं.पोलिसांनी नंतर त्यांच्या पद्धतीने तिला बोलतं केले. ती जे काही  लपवत होती ते शेवटी पोलिसांच्या धाकाने उघडकीस आलं. पोलिस लगेच धावले आणि त्यांना सपनाची ३ महिन्याची लेक पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळली. तिला सपनाने स्वतः पाण्यात बुडवले होते. तिचा निर्घृणपणे जीव घेतला होता. पोलिसांनी सपनाला अटक केले. तिने असे का केले हे विचारल्यावर ती म्हणाली,
 
" माझी मोठी मुलगी ८ वर्षांची आहे, त्या मुलीनंतर मुलगाच व्हायला पाहिजे म्हणून घरचे माझा खूप छळ करत होते. दुसरीही मुलगी झाल्यावर त्यांची इच्छा अपूर्ण राहिली."
 

दोन दिवसात मुंबई क्राईम ब्रांचने याचा छडा लावला हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मुलगा होत नाही म्हणून एका आईने आपल्या फक्त ३ महिन्याच्या मुलीला मारले.आजही 'मुलगाच पाहिजे' ही प्रवृत्ती समाजात  आहे. त्या निरागस बाळाचा नाहक जीव गेलाच पण त्या ८ वर्षाच्या मुलीने आपली आईही गमावली.
काहीही  कारण असो गुन्हा हा गुन्हा असतो आणि त्याला शिक्षाही झालीच पाहिजे हे सत्य आहे पण ही घटना अनेक प्रश्न निर्माण करते.

एखादी आई पोटच्या बाळाची ते बाळ केवळ मुलगी आहे म्हणून हत्या कशी करू शकते ? का करते ? या घटनेत केवळ आई गुन्हेगार आहे की असे टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडणारे संपूर्ण कुटुंबच गुन्हेगार आहे ? आपल्या चॅनेलवर चालणार्‍या अनेक मालिकातून कौटुंबिक समस्या 'कथा विषय' म्हणून दाखवल्या जातात त्या पण आपल्या मनावर परिणाम करतात का ?  मुंबईसारख्या सुशिक्षित महानगरात पण असे घडत असेल तर आपण केवळ 'पोटार्थी आणि स्वार्थी गर्दी'आहोत.समाज म्हणवून घेण्याचा आपल्याला अधिकारच नाही  हे आपल्या लक्षात का येत नाही ? महिला सबलीकरण फक्त योजनेपुरतेच मर्यादित आहे का ? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मानसिक संभ्रमावस्थेत असतानाच ही संभ्रमावस्था टोकाला पोहचण्यापूर्वी समुपदेशन करणार्‍यांची संख्या का कमी आहे?  
आता या घटनेवर चर्चा होईल .लाखांच्या संख्येत फॉरवर्ड एकमेकांना पाठवले जातील.चार सुतकी शब्द ऐकू येतील.सपनाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळेलच. पण एक प्रश्न शेवटी राहतोच,आजही आपला समाज वंश चालवण्यासाठी मुलीच्या जन्माला का स्वीकारत नाही?

शीतल दरंदळे