निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायामाचे महत्त्व खूप आहे. आजकाल सगळेजण आपल्या तब्येतीला जपतात, मग भले प्रत्येकाच्या व्यायामाच्या पद्धती वेगळ्या का असेनात. कोणाला चालण्याचा व्यायाम आवडतो, कोणाला योगा, झुंबा, जिम तर काही जणांना एखादा मैदानी खेळ खेळायला आवडतो. यातला कुठला प्रकार चांगला हे सांगणे अवघड आहे, पण चालण्याचा व्यायाम हा साधा, सोपा आणि सहज करण्यासारखा व्यायाम!! त्यात १०,००० पावले चालणे सर्वात आरोग्यदायी मानले जाते. मग आज आपण पाहूयात की रोज १०,००० पावले चालण्याचा फायदा काय? चालणे चांगले की इतर व्यायाम चांगला? रोज अर्धातास व्यायाम करण्याचा पर्याय कोणासाठी चांगला? दोन्ही पर्याय कश्याप्रकारे उपयोगी पडतात हे समजून घेऊयात.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधनानुसार निरोगी आणि सशक्त राहण्यासाठी आठवड्यातून १५० मिनिटे व्यायाम करणे गरजेचे असते. त्यातही मध्यम आणि उच्च-तीव्रतेच्या दोन्ही प्रकारच्या व्यायामाची शिफारस केली जाते. दर आठवड्याला किमान पाच दिवस ३० मिनिटे व्यायाम करण्यामुळे तुम्हाला तब्येत चांगली राखणे सोपे जाईल. आणि व्यायामामुळे शरीर लवचिक बनते हा जादाचा फायदा तर आहेच.


