स्वयंपाकात मसाल्यांऐवजी चक्क 'माती' वापरणारं बेट!! या रुचकर मातीचं नक्की काय प्रकरण आहे??

लिस्टिकल
स्वयंपाकात मसाल्यांऐवजी चक्क 'माती' वापरणारं बेट!! या रुचकर मातीचं नक्की काय प्रकरण आहे??

काही चूक झाली की 'माती खाल्ली' असं म्हणण्याची सर्रास पद्धत आहे. पण जगात असे एक बेट आहे जिथे लोक स्वयंपाकात चवीसाठी कुठलाही मसाला न वापरता चक्क तिथली माती किंवा चिखल वापरतात. धक्कादायक आहे ना हे? आज याच बेटाची सफर आपण करणार आहोत.

हे बेट आहे इराणमध्ये. याचे नाव होर्मुझ बेट. इथे म्हणे माती इतकी चांगली आहे की ती रोजच्या जेवणात वापरली जाते. तिथले रहिवासी याचा वापर स्वयंपाकात करतात. या मातीमुळे अन्नाची चव सुधारते आणि जेवण चवदार बनते. त्यामुळे येथील रहिवासी पारंपारिक मसाल्यांऐवजी चिखलाचा वापर करतात. बरं, ही माती एकच प्रकारची नाही. इथल्या पर्वतात वेगवेगळ्या प्रकारची चवीची मातीही मिळते. तीचा वापर इथले रहिवासी खुबीने करतात. ते कोणत्याही पाककृतीमध्ये मसाला घालावा त्याप्रमाणे माती मिसळतात.

होर्मुझ बेट पर्शियन गल्फजवळ आहे. या बेटाला इंद्रधनुषी बेट ही म्हणतात. कारण इथे असलेले रंगीबेरंगी पर्वत! लाल, पिवळे, तपकिरी, निळे ,हिरवे असे वेगवेगळ्या रंगाचे पर्वत आहेत. त्याची मातीही केवळ रंगीत, चविष्ट नाही तर पौष्टिकही आहे. आणि विशेष म्हणजे या बेटाला भेट देणार्‍या पर्यटकांनाही याचे खूप आकर्षण आहे. इथल्या वेगळ्या चवीमुळे येणारे पर्यटक पदार्थ चवीने खातात. suragh नावाची पारंपरिक डिश इराणमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

तुम्ही म्हणाल, "काहीही!! अशी माती कोण खाते?" पण ही साधीसुधी माती नाही. इथली माती लोहाने समृद्ध आहे आणि त्यात सुमारे ७० प्रकारची खनिजे आहेत. या बेटावर काही टेकड्यांवर मिठाचे ढिगारेही आढळतात. या पर्वतांवरच्या चवदार मातीचे खरे कारण शोधण्यासाठी अजूनही अभ्यास सुरू आहे,त्यासाठी अनेक चाचण्या करण्यात येतात.

ब्रिटनच्या मुख्य भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. कॅथरीन गुडनफ यांच्या मते या टेकड्यांवर लाखो वर्षांपासून खनिजे साठत आहेत आणि त्याचे रूपांतर मातीत झाले आहे. या रूचकरपणाचं रहस्य कदाचित या खनिजांत असू शकेल. इथले स्थानिक लोक मातीचा रंग पाहून तिची चव ओळखतात.

आता जर कधी या बेटावरचे पदार्थ खाण्याचा कधी प्रसंग आलाच, तर अभिमानाने 'माती खाल्ली' असं आपण म्हणू शकू. हो ना?

शीतल दरंदळे