चाळिशीच्या आतबाहेर असताना कधीकधी पायाच्या किंवा हाताच्या बोटांपाशी किंवा गुडघे, घोटा, कोपर अशा ठिकाणी अचानक सूज येते, ठसठसणाऱ्या वेदना जाणवतात. रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे हे होते. या विकाराला गाउट किंवा संधिरोग असे म्हणतात.
संधिरोग हा आर्थ्रायटिस म्हणजे संधिवाताचाच एक प्रकार आहे. यात सांध्यांच्या अवतीभवती युरिक ऍसिडचे स्फटिक जमा होतात आणि त्यामुळे अचानक त्या जागी सांधेदुखी सुरू होते व सूज येते. हे स्फटिक शरीरात गुडघे, घोटा, कोपर, बोटे, अंगठा अशा ठिकाणी साचतात. हा विकार जास्त करून पुरुषांना होतो आणि साधारण तिशीनंतर उद्भवतो. स्त्रियांना मेनोपॉजमध्ये हा त्रास होण्याची शक्यता वाढते. ह्यामुळे येणारी सूज, लाली अचानक येते, ३-४ दिवस तशीच टिकून राहते आणि नंतर आपोआप नाहीशी होते. संधिरोगाचा प्रभाव पायाची बोटं, तळपायाचा खोलगट भाग, घोटा, गुडघा, बोटं, मनगट, कोपर या जागी जाणवतो.




