जगभरात गेल्या एक दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. दुसऱ्या लाटेत भारतात अतिशय गंभीर परिस्थिती बनली होती. अजूनही बऱ्याच ठिकाणी परिस्थिती वाईट आहे. व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. पण अश्यावेळी कोलकत्ता येथील शास्त्रज्ञाने या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना श्वास घेणे सहज शक्य होणार आहे. डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी यांनी पॉकेट व्हेंटिलेटर तयार केले आहे. या अनोख्या शोधासाठी त्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे.
कोलकातामधील डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी हे स्वतः व्यवसायाने अभियंता आहेत. त्यांना कोरोना संसर्ग झाला तेव्हा त्यांची ऑक्सिजन पातळी खूप खाली गेली होती. SpO2 लेव्हल 88 पर्यंत खाली आली तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्याच वेळेस त्यांना असे काही उपकरण बनवता येईल असा विचार मनात आला. बरे झाल्यावर त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली आणि फक्त वीस दिवसांत त्यांनी २५० ग्रॅम वजनाचे पॉकेट व्हेंटिलेटर तयार केले. एकदा चार्ज केल्यानंतर हे व्हेंटिलेटर आठ तासांपर्यंत काम करू शकते अन्ड्रॉइड फोनच्या चार्जनंही हे चार्ज केलं जाऊ शकते.हे छोटेसे व्हेंटिलेटर रुग्णासाठी सहज कुठेही नेता येण्यासारखे आहे.

