उंदीर म्हणले की काय आठवते? त्रास हो ना? म्हणजे घरात घुसून कपडे फाडणारा, अन्नधान्याची नासधूस करणारा, शेतकऱ्यांनी साठवलेले धान्य खाऊन त्रास देणारा, कागद कुरतडणारा.. थोडक्यात, हा प्राणी नकोच असतो. पण कोणी सांगितले या उंदराने अनेकांचे प्राण वाचवले तर? विश्वास नाही बसणार ना! हे खरच घडले आहे, गेले पाच वर्ष तो हे काम इमानाने करतोय आणि आता मानाने निवृत्ती घेतोय. कोण आहे हा हिरो रॅट?
कंबोडियामध्ये तब्बल ७१ सुरुंग तसेच कित्येक स्फोटक शोधून हजारो जणांचे प्राण वाचवणारा मागवा उंदीर नुकताच सेवानिवृत्त झाला आहे. वयोमानानुसार त्याची सुरुंग शोधण्याची शक्ती कमी होऊ लागल्याने तो आता सेवानिवृत्त झाला आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मागवाला PDSA संस्थेने सुवर्ण पदक देऊन सन्मानित केलं होतं. गेल्या ७७ वर्षांमध्ये हा सन्मान मिळवणारा मागवा हा असा पहिलाच उंदीर आहे. दरवर्षी हा सन्मान कुत्र्यांना देण्यात येतो. याला 'हिरो रॅट' असेही म्हणले जाते.






