क छोटा किस्सा. एका ट्रेनच्या डब्यात एक आजीबाई बसलेल्या आहेत. डबा जवळपास रिकामा. मध्ये कुठल्याशा स्टेशनवर एक तरुण मुलगी डब्यात चढते. आजीबाईंच्या समोरच्या बाकावर येऊन बसते. त्यांच्याकडे बघून छान हसते. आजीबाई खूश. हळूहळू गप्पा सुरू होतात. तुम्ही कुठले आम्ही कुठले या जुजबी गप्पांनंतर हळू हळूहळू गप्पांना रंग भरतो. मग नकळत बोलण्याची सूत्रं मुलीकडे जातात. ती इतकी बोलते, इतकी बोलते, की काही वेळानंतर आजीबाईंना आपलं डोकं दुखतंय असं वाटायला लागतं. तरीही पठ्ठी थांबायला तयार नाही. हळूहळू आजीबाईंचं डोकं चांगलंच ठणकायला लागतं. आता ही बया तोंडाचा पट्टा थांबवेल तर बरं असं त्यांना मनोमन वाटायला लागतं. शेवटी हळूच त्या तिला तसं सुचवतात. ती चतुर मुलगी गोडसं हसते आणि आपल्या बॅगेतून एक बामची डबी काढून देते. किंमत फक्त वीस रुपये. मार्केटिंगचा हा अनोखा फंडा पाहून आजीबाई अवाक होतात.
हा किस्सा आपल्या आजच्या विषयाशी बराचसा जवळचा आहे.
कोव्हिडनंतर आता एका नवीन विषाणूची चर्चा सुरू आहे. तो म्हणजे मंकीपॉक्स. हा तसा आपल्या देवी ऊर्फ स्मॉलपॉक्सचा जातभाई. आजतागायत चौदा देशांमध्ये मिळून या रोगाचे १००ही रुग्ण नाहीत. अजून एक जमेची बाजू म्हणजे या मंकी पॉक्स विषाणूने भारताचा उंबरठा ओलांडलेला नाही. तो तिकडे दूर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युके, स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल, बेल्जियम, जर्मनी, नेदरलॅंड्स, इटली, स्वीडन या देशांमध्ये तळ ठोकून आहे. अलीकडे इस्रायल आणि स्वित्झर्लंड या देशांमध्येही काही रुग्ण आढळलेत. पण तरी त्याच्यासाठी 'दिल्ली बहोत दूर हैं..'



