उकडतंय? एसी ऑन करा! बाहेर खूप ऊन आहे ना? अरे मग उघडा फ्रिज, मस्तपैकी गार पाण्याची बाटली ओठांना लावा. ती पाण्याची गार धार घशातून पोटात उतरत जाताना किती ‘आहा ssss’ वाटतं ना? अशा वेळी कळत नकळत आपण हे शोध लावून आपलं आयुष्य सोपं करणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचे आभार मानतो की नाही? पण आपलं आयुष्य सुकर होणं या स्वार्थी विचारापलीकडं जाऊन आपण कधी गंभीरपणे विचार केलाय का? आपण नक्की कशाची किंमत देऊन हे सुख मिळवत आहोत?
चला तर वाचू या थॉमस मिगेली (ज्यु) या शास्त्रज्ञाची कहाणी. यानं असे काही शोध लावले की त्यातून माणसाच्या काही समस्यांवर उत्तरं जरुर मिळाली, पण बदल्यात पर्यावरणाची अपरिमित हानी झाली. निसर्गाच्या असंतुलनाचा धोका पत्करत लावलेले हे शोध खरंच इतके अपरिहार्य होते का? असाच प्रश्न आज मनात उभा राहतो.



