आपल्याकडे दान खूप् महत्त्वाचं मानलं जातं. अन्नदान, जलदान, धनदान, विद्यादान, रक्तदान ही सगळीच दाने श्रेष्ठ मानली गेली आहेत. याच यादीत अजून एक नाव जोडणे गरजेचे आहे, ते म्हणजे अवयवदान. जिवंतपणी आणि मृत्यूनंतरसुद्धा हे दान करून गरजूंचे प्राण वाचवता येतात. एका व्यक्तीने दान केलेले अवयव दुसऱ्या गरजू व्यक्तीच्या शरीरात बसवले जातात, म्हणजेच प्रत्यारोपित केले जातात. यामुळे तिचा केवळ जीवच वाचतो असे नाही तर जगण्याचा दर्जाही सुधारतो.
एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होणारे अवयवांचे प्रत्यारोपण आज जगभरात असाध्य आजारावरचा उत्तम पर्याय म्हणून स्वीकारला जात आहे. गंभीर स्वरूपाचा हृदयविकार किंवा शेवटच्या स्टेजचा किडनीचा आजार यासारख्या गंभीर रोगांसाठी ऑर्गन डोनेशन किंवा संबंधित अवयवाचे प्रत्यारोपण हा खात्रीशीर उपाय ठरतो.








