कॉम्प्युटरचा उदय झाला त्या काळात कॉम्प्युटर म्हणजे जणू एक बडं प्रस्थ होतं. एनियॅक नाव असलेले हे कॉम्प्युटर्स आकाराने महाप्रचंड होते आणि जवळपास अख्खी खोली व्यापून टाकायचे. त्या काळातलं प्रोग्रामिंगही आजच्यासारखं नव्हतं. आज की-बोर्ड च्या मदतीने टायपिंग करून कॉम्प्युटरला विशिष्ट लँग्वेज मध्ये काय करायचं यासंबंधीच्या सूचना देता येतात. या सूचनांची एक फाईल तयार होते आणि ती कॉम्प्युटरच्या डिस्कवर सेव्ह केली जाते. त्या काळात मात्र असं नव्हतं. एखाद्या कामासाठी कॉम्प्युटरला द्यायच्या सूचना एका कागदावर लिहून प्रोग्रामर्स थेट मशीनच प्रोग्रॅम करायचे. त्यासाठी हजारो स्विचेसच्या गर्दीमधून ते नेमकी स्विचेस ऑपरेट करायचे आणि विशिष्ट प्लग्ज आणि वायर्सची जुळणी करून सूचना द्यायचे. थोडक्यात, प्रोग्रामिंग हार्डवेअरच्या माध्यमातून व्हायचं. अर्थातच हे काम खूप किचकट होतं. हे काम करणाऱ्या सुरुवातीच्या प्रोग्रॅमर्सपैकी एक म्हणजे जीन बार्टीक ही महिला.
जीनला ह्यूमन कॉम्प्युटर म्हणूनही ओळखलं जातं. एखाद्या विशिष्ट कार्यासाठी ज्या गणिती क्रिया कराव्या लागत असतील त्या हाताने (manually) करणं हे या ह्यूमन कॉम्प्युटर्सचं मुख्य काम होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत लष्कराने मोठ्या प्रमाणावर ह्यूमन कॉम्प्युटर्स म्हणून काम करण्यासाठी गणितज्ञांची भरती केलेली होती. हे गणितज्ञ ट्रॅजेक्टरी कॅल्क्युलेट करण्याचं काम करायचे.







